Headlines

भांबरवाडीत वृद्धाने बिबट्याला तोंडात काठी घालून पळवले:जखमी गणपत जाधव यांच्यावर कन्नडच्या रुग्णालयात उपचार सुरू; 18 तास उलटूनही वन विभाग फिरकेना


.

भांबरवाडी येथील उपळा शिवारातील गट क्रमांक ५० मध्ये महामार्गालगतच्या शेतातील झोपडीत झोपलेल्या ६५ वर्षीय शेतकऱ्यावर बुधवारी मध्यरात्री २ वाजता बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. शेतकऱ्याने प्रतिकार करत बिबट्याच्या तोंडात काठी घालून आरडाओरडा केल्याने बिबट्या पसार झाला. अंगावर गोधडी असल्याने शेतकऱ्याचा जीव वाचला असून उजवा हात उघडा असल्याने त्यावर बिबट्याने पायांच्या नखांनी जखमा केल्या.

कन्नड-चाळीसगाव महामार्गालगत गणपत जाधव यांचे शेत आहे. शेतातच त्यांचे झोपडीवजा घर आहे. कुटुंबातील इतर सदस्य ऊसतोडणीसाठी बाहेरगावी गेले असल्याने जाधव घरी एकटेच होते. जेवण करून ते घरासमोर बाजेवर झोपले होते. थंडी असल्याने त्यांनी अंगावर गोधडी पांघरली होती, केवळ त्यांचा उजवा हात गोधडीच्या बाहेर होता. मध्यरात्री बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला आणि गोधडीबाहेर असलेल्या उजव्या हाताच्या मनगटाला चावा घेतला. दरम्यान, वन विभागाच्या कारभारावर जिल्हा परिषद सदस्य डॉ. तृप्ती राजपूत, डॉ. दिलीपसिंग राजपूत, डॉ. संजय गव्हाणे, राहुल राठोड यांनी संताप व्यक्त केला आहे.

अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. जाधव यांच्या उजव्या हाताच्या मनगटाला बिबट्याचे दोन दात लागून दुखापत झाली आहे. तसेच खांद्याखाली दंडावर पंजाची गंभीर जखम आहे. त्यांना अँटी-रेबीज आणि अँटी-बायोटिक इंजेक्शन्स देण्यात आले असून पुढील महिनाभर त्यांना वैद्यकीय निगराणीखाली ठेवले जाईल, असे कन्नड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध गायकवाड यांनी सांगितले. या घटनेची मला माहिती नाही, मी सध्या कामासाठी वैजापूर येथे आलो असल्याचे सहायक वनसंरक्षक विशाल कवडे यांनी सांगितले. मी छत्रपती संभाजीनगर येथे होतो.

पंचनामा करण्यासाठी लवकरच जाणार आहे. घटनास्थळी वनरक्षक यशदा साळवे आहेत, मी त्यांच्याशी संपर्क साधत असल्याचे वनपाल प्रवीण पारधी यांनी सांगितले. मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांनी सांगितले की, जाधव यांनी अंगभर गोधडी गुंडाळून घेतली होती, त्यामुळे बिबट्याला त्यांच्या गळ्याचा घोट घेता आला नाही. हात बाहेर असल्याने त्याने हातावर हल्ला केला अन् गोधडी सुरक्षा कवच ठरली.

जाधव यांच्या आरडाओरडीने ग्रामस्थ गोळा झाले. त्यांनी तातडीने जाधव यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. भांबरवाडी परिसरात बिबट्याची दहशत आहे. वर्षभरापूर्वी येथे ऋषी विलास राठोड (१७) या विद्यार्थ्याला बिबट्याने हल्ला करून ठार केले होते. आतापर्यंत बिबट्याने परिसरातील ६५ पाळीव जनावरे मारली असून वन विभागाचे अधिकारी लक्ष देत नसल्याची ओरड आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *