![]()
“निवडणुकीत विजय झाला म्हणून फार हुरळून जायचे नसते आणि पराभवाने निराश व्हायचे नसते. मतमोजणीचे अधिकृत प्रमाणपत्र हातात येईपर्यंत अंतिम निकाल गृहीत धरू नये, एवढी परिपक्वता आणि खबरदारी जबाबदार पदांवर बसलेल्या सर्वांनीच घेतली पाहिजे. मात्र, अतिउत्साहात केलेले ट्विट अखेर डिलीट करण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांवर ओढवली. विधानपरिषदेच्या 5 पैकी 3 जागांवर महाविकास आघाडीने मिळवलेला विजय हा महाराष्ट्रात सुरू झालेल्या एका नवीन बदलाचा आणि राजकीय ट्रेंडचा स्पष्ट संकेत आहे,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर थेट निशाणा साधला. पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी विधानपरिषद निकाल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे डिलिट झालेले ट्विट, पक्षाचे मूळ संविधान आणि निवडणूक आयोगाचा अन्याय, कर्जत-भीमाशंकर येथील वृक्षतोड, पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सरकारचा ‘सिलेक्टिव्ह’ दृष्टिकोन यावर सडेतोड उत्तरे दिली. प्रत्येक बॉल खेळायचा नसतो; मायबाप जनतेने निकाल दिला! विधानपरिषद निकालांवर आणि भाजपच्या दाव्यांवर बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे ३ जागांवर जनतेने महाविकास आघाडीला कौल दिला आहे. मी अत्यंत प्रांजळपणे व विनम्रपणे महाराष्ट्रातील मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानते.” चंद्रकांत पाटलांना टोला खासदार सुळे म्हणाल्या, “पश्चिम महाराष्ट्रात चंद्रकांत दादा पाटील प्रचारात मोठे दावे करत होते; परंतु प्रत्येक विधानाला उत्तर देणे गरजेचे नसते आणि प्रत्येक बॉल खेळायचा नसतो. मतदारांनी मतपेटीतून स्वतःचे उत्तर देऊन टाकले आहे. उत्तर प्रदेशातही समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विधानपरिषदेत अतिशय उत्तम यश मिळवले आहे, त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून अभिनंदन करते.” संविधानानुसार पक्ष आमचाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या न्यायालयीन लढाईवर आणि पक्षाच्या मालकीहक्कावर त्यांनी वस्तुस्थिती मांडली. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आदरणीय शरद पवार साहेबांनी केली. पक्षाचे संविधान स्पष्ट सांगते की, पक्ष कोणाचा हे केवळ आमदार किंवा खासदारांच्या संख्येवर ठरत नाही, तर पक्षाचे मूळ पदाधिकारी आणि संघटना ज्यांच्यासोबत असते त्यांचा पक्ष असतो.” आठ वेळा न्यायालयात फेऱ्या “आम्ही आठ वेळा निवडणूक आयोगाच्या दारात गेलो, मात्र निवडणूक आयोगाने आमच्यावर आणि शिवसेनेवर उघड अन्याय केला. हा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू असून जनतेच्या न्यायालयाने आधीच योग्य निकाल दिला आहे.” महायुतीतील अंतर्गत वादावर मत “महायुतीमध्ये सुरू असलेली भांडणे आणि कुरघोडी हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. माझ्यासमोर आज महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि भीषण दुष्काळ ही प्रमुख आव्हाने आहेत आणि सरकारने दुष्काळाचे राजकारण न करता जनतेला दिलासा दिला पाहिजे.” राज ठाकरेंच्या प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यावीत कर्जत-भीमाशंकर परिसरातील वृक्षतोड आणि प्रस्तावित प्रकल्पांवर बोलताना त्यांनी पारदर्शकतेची मागणी केली. “सुमारे 10 वर्षांपूर्वी ग्लोबल वॉर्मिंग हा केवळ चर्चेचा विषय वाटायचा, पण आज उन्हाची तीव्रता, पावसाचा अभाव आणि पाणीटंचाई यातून त्याचे थेट परिणाम आपण भोगत आहोत. विकासाला आमचा कधीच विरोध नव्हता, मात्र पर्यावरणाचा समतोल राखलाच पाहिजे.” विरोधकांसमोर सादरीकरण करा “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांची सरकारने पारदर्शकपणे उत्तरे दिली पाहिजेत. सरकारने सर्वपक्षीय विरोधकांना बोलावून प्रकल्पाचे सादरीकरण करावे आणि जनतेच्या शंकांचे निरसन करावे.” पुणे आता ‘क्राइम हॉटस्पॉट’ बनले पुण्यातील कायदा-सुव्यवस्था आणि नुकत्याच घडलेल्या राजकीय-गुन्हेगारी घटनांवर त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. “पुणे शहर आणि माझा मतदारसंघ आज गुन्हेगारीचा हॉटस्पॉट बनला आहे, हे सांगताना मला अत्यंत दुःख होते. हा माझा स्वतःचा दावा नाही, तर केंद्र सरकारमधील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या गृह मंत्रालयाचा अधिकृत डेटा सांगतो की, महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे पुण्यात घडत आहेत.” राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरण “राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ला आणि त्यासंदर्भात समोर येत असलेल्या बाबींवर पुणे पोलिसांनी निःपक्षपातीपणे आणि पारदर्शकपणे तपास करून जनतेसमोर सत्य मांडले पाहिजे.” पाणी नियोजनात सरकार अपयशी पुण्यातील पाणीप्रश्न आणि जिल्हा परिषद निवडणुकांवर त्या म्हणाल्या, “शेतकरी असो वा पुणेकर नागरिक, कोणाच्याही हक्काच्या पाण्यावर गदा येता कामा नये. जलसंपदा विभाग आणि शासनाने ही बैठक १ ते २ महिने अगोदर घ्यायला हवी होती, सरकारच्या सध्याच्या पाणी नियोजनावर आम्ही समाधानी नाही.” निवडणुकांमध्ये दुटप्पीपणा “सर्वोच्च न्यायालयाने 50 टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यास सांगितले आहे. मात्र, सरकार अत्यंत सिलेक्टिव्ह पद्धतीने निवडणुका पुढे ढकलत आहे. सांगली आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुका होतात, मग केवळ पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (PDCC) निवडणूक दुष्काळाचे कारण पुढे करून का लांबवली गेली? हे एकाच्या मर्जीने चालणारे राज्य नाही,” असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला. ———————————————————————— हेही वाचा… 18 वर्षांत जनतेची कामे केली नाहीत म्हणून पराभव: सतीश चव्हाणांच्या पराभवावर भाजप आमदार प्रशांत बंब यांची प्रतिक्रिया मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा पराभव झाला आहे. या मतदारसंघावर सलग १८ वर्षे वर्चस्व गाजवणाऱ्या चव्हाणांच्या पराभवानंतर आता महायुतीतच आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी या पराभवाचे खापर थेट सतीश चव्हाणांच्या १८ वर्षांच्या अकार्यक्षमतेवर आणि त्यांच्या बोलण्यातील ‘आविर्भावा’वर फोडले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
हा परिवर्तनाचा नवीन ट्रेंड:विधानपरिषद विजयानंतर सुप्रिया सुळे यांचा भाजपला टोला, पुणे क्राइम हॉटस्पॉट झाल्यावरून केंद्राच्या अहवालाचा दाखला