Headlines

मुलांचा रोजचा थकवा पोषणाच्या कमतरतेचे लक्षण असू शकतो:लोहाची कमतरता, अपुरी झोप आणि मानसिक ताणही कारणे; बालरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश काथवटे यांचा सल्ला




शाळेतून घरी आल्यानंतर मुलांना थकवा जाणवणे स्वाभाविक आहे. मात्र, मूल रोज थकून येत असेल, खेळण्याचा उत्साह कमी झाला असेल किंवा थोड्या हालचालींनीही थकवा जाणवत असेल, तर पालकांनी लक्ष द्यावे. दप्तराचे ओझे किंवा अभ्यासाचा ताण हेच कारण नसून, अपुरी झोप, पोषक घटकांची कमतरता आणि आरोग्याच्या काही समस्यांमुळेही थकवा येऊ शकतो, असे बालरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश काथवटे यांनी सांगितले. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी पुरेशी झोप आणि संतुलित आहार गरजेचा आहे. नाश्ता टाळणे, वेळेवर जेवण न करणे आणि आहारातून लोह, प्रथिने यांसारखे पोषक घटक न मिळणे यामुळे ऊर्जा कमी होऊ शकते. लोहाच्या कमतरतेमुळे रक्तक्षय होऊन थकवा जाणवू शकतो. पुरेसे पाणी न पिणे, रात्री उशिरापर्यंत मोबाइल किंवा दूरचित्रवाणी पाहणे आणि अनियमित झोप यांचाही मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. शाळा, शिकवणी, परीक्षा आणि विविध उपक्रमांमुळे मुलांचे वेळापत्रक व्यस्त होते. पुरेशी विश्रांती आणि खेळण्यासाठी वेळ न मिळाल्यास थकवा वाढू शकतो. परीक्षेचा दबाव, अभ्यासातील अडचणी किंवा मित्रमैत्रिणींशी मतभेद यांमुळेही मुलांवर मानसिक ताण येऊ शकतो. चिडचिड, उदासीनता, एकटे राहण्याची इच्छा आणि एकाग्रता कमी होणे ही त्याची लक्षणे असू शकतात. मुलाला अनेक आठवडे थकवा जाणवत असेल, वजन किंवा भूक कमी होत असेल, चक्कर येत असेल, धाप लागत असेल किंवा दैनंदिन कामांवर परिणाम होत असेल, तर बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. गरजेनुसार डॉक्टर तपासण्या सुचवू शकतात. पालकांनी स्वतःहून जीवनसत्त्वे किंवा इतर औषधे देणे टाळावे. मुलांच्या थकव्यामागचे कारण वेळेत ओळखून योग्य उपचार करावेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *