![]()
पुणे जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन, चारा उत्पादन, जलसंधारण आणि टंचाईवरील उपाय वेळेत राबवावेत. सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून नागरिकांना मदत द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत पवार यांनी जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेतला. बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, महापौर मंजुषा नागापुरे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार विजय शिवतारे, राहुल कुल, शंकर मांडेकर आणि बाबाजी काळे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आणि विविध लोकप्रतिनिधीही बैठकीला उपस्थित होते. पिण्यासाठी राखीव पाण्याचा वापर नियोजनानुसार करावा. ग्रामीण भागात गरजेनुसार टँकरने पाणी द्यावे. रब्बी पिकांसाठी पाण्याचे नियोजन करताना पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे, अशा सूचना पवार यांनी दिल्या. पशुधनासाठी चारा उपलब्ध व्हावा म्हणून चारा लागवड प्रकल्प राबवला जात आहे. शेतकऱ्यांना बियाणे देण्याचे नियोजन आहे. उपलब्ध पाणी जपून वापरावे आणि कमी पाण्यात येणाऱ्या चारा पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन द्यावे, असे पवार म्हणाल्या. जलसंधारणाची कामे हाती घेऊन पाण्याचे स्रोत बळकट करावेत. आवश्यक कामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्याची कार्यवाही करावी. नगरपरिषद क्षेत्रे आणि ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. दुष्काळामुळे इतर भागांतून नागरिक स्थलांतर करू शकतात, हे लक्षात घेऊन प्रशासनाने सतर्क राहावे. सरकारी योजनांची अंमलबजावणी वेळेत करून नागरिकांना मदत द्यावी. सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवावा, असे आवाहन पवार यांनी केले. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दुष्काळी स्थिती आणि प्रशासनाकडून सुरू असलेल्या टंचाई निवारणाच्या उपायांची माहिती दिली. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात १ हजार ५४ जलसंधारणाची कामे निश्चित केली आहेत. कामांचा आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले. शेततळी, बंधाऱ्यांची दुरुस्ती, पाण्याचे स्रोत बळकट करणे आणि कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना फळ्या बसवणे अशी कामे प्रस्तावित आहेत. बैठकीला जिल्ह्यातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Source link
पुण्यातील दुष्काळी स्थितीवर समन्वयाने काम करण्याचे निर्देश:उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पिण्याचे पाणी, रब्बी हंगाम, चारा आणि जलसंधारणाला प्राधान्य देण्यास सांगितले