![]()
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकमेकांवर कठोर शब्दांत टीका करण्याची एकही संधी न सोडणारे रामराजे नाईक निंबाळकर आणि मंत्री जयकुमार गोरे बुधवारी कराड येथील प्रचार मेळाव्यात एकाच मंचावर, एकमेकांच्या शेजारी बसलेले दिसले. दोघांमधील पूर्वीचा टोकाचा संघर्ष पाहता त्यांच्या या जवळिकीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राजकारणात कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतात, याचीच प्रचिती या घडामोडीतून आल्याची चर्चा सातारमध्ये रंगू लागली आहे. आरोप-प्रत्यारोपांपासून हास्यविनोदापर्यंतचा प्रवास रामराजे नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्यातील राजकीय संघर्ष अनेकदा जाहीर सभांमधून समोर आला आहे. पाणी, विकास आणि स्थानिक राजकारणाच्या मुद्द्यांवरून दोघांनीही एकमेकांवर टीका केली होती. गोरे यांनी रामराजे यांच्यासाठी ‘औताचा बैल’ आणि ‘फलटणचा शकुनी’ यांसारखे टोमणे वापरले होते. तर रामराजे यांनीही आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर देत गोरेंवर निशाणा साधला होता. अशा पार्श्वभूमीवर कराडच्या मेळाव्यात दोघेही शेजारी बसून हास्यविनोद करताना दिसल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणांबाबत तर्कवितर्कांना सुरुवात झाली. कालपर्यंत एकमेकांवर टीका करणारे नेते आज एकाच व्यासपीठावर कसे, असा प्रश्न राजकीय चर्चांमध्ये उपस्थित होत आहे. भाजपमधील समीकरणांमुळे संघर्षाला धार जयकुमार गोरे यांनी २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी जवळीक वाढली. त्यानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशीही त्यांचे राजकीय संबंध दृढ झाले. या बदललेल्या समीकरणांमुळे रामराजे नाईक निंबाळकर आणि गोरे यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे राजकीय घडामोडींवरून दिसून आले. एका महिलेशी संबंधित प्रकरणावरूनही दोन्ही नेत्यांमध्ये संशय आणि आरोपांचे वातावरण निर्माण झाल्याचे वृत्त होते. यानंतर विविध सभांमधून दोघांमधील शाब्दिक संघर्ष सुरूच राहिला. गोरे यांनी रामराजे यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीवर प्रश्न उपस्थित केले, तर रामराजे यांनी गोरेंच्या राजकीय कार्यपद्धतीवर टीका केली. भाजपमधील काही नेत्यांच्या कार्यपद्धतीवरही रामराजे यांनी नाराजी व्यक्त केली होती. रामराजेंचा ‘सेन्सरशिप’चा टोला चर्चेत जयकुमार गोरे यांच्या टीकेला उत्तर देताना रामराजे यांनी सोशल मीडियावर उपरोधिक भूमिका मांडली होती. ‘देवाने त्यांना सद्बुद्धी द्यावी’, असे म्हणतानाच आपण सध्या तोंडाला सेन्सरशिप लावली असून ती योग्य वेळी उठवू, अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली होती. तसेच, गोरे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या राजकीय जोडीवरही रामराजे यांनी टीका केली होती. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील वाद केवळ वैयक्तिक टोमण्यांपुरता मर्यादित न राहता जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाच्या संघर्षाचाही भाग बनला होता. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नवे राजकीय संकेत? आता सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दोन्ही नेते एकाच मंचावर जवळ बसलेले दिसल्याने त्यांच्या संबंधांमध्ये बदल झाला आहे का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक हितसंबंध, गटांची जुळवाजुळव आणि बदलती राजकीय गणिते महत्त्वाची ठरतात. त्यामुळे या मेळाव्यातील उपस्थितीला जिल्ह्यातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने महत्त्व दिले जात आहे. —————- ———– हेही वाचा.. परीक्षा शुल्कावरून रोहित पवार विद्यार्थ्यांसाठी आक्रमक:म्हणाले- सवलती कमी आणि अटी जास्त, सरकारने 2 तारखेपूर्वी सरसकट निर्णय घ्यावा
राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि शैक्षणिक शुल्क माफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य सरकारने नुकताच परीक्षा शुल्क माफीचा निर्णय जाहीर केला असला, तरी त्यात सवलती कमी आणि जाचक अटीच जास्त असल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे. तसेच, येत्या २ तारखेपूर्वी सरकारने औदार्य दाखवून विनाअट सरसकट शुल्क माफीचा निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे. रोहित पवार यांनी पोस्ट करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले आहे. सविस्तर वाचा
Source link
कट्टर विरोधक एकाच मंचावर:रामराजे निंबाळकर आणि जयकुमार गोरेंच्या भेटीची साताऱ्यात जोरदार चर्चा