![]()
नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरीच्या पवित्र तीरावर वसलेल्या, संत एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पैठणनगरीतील मोक्षघाटावर आज सकाळी १०.३० वाजता ३१ फुटी खांबावर १५ फुटांचा ध्वज खासदार संदिपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते फडकवण्यात येणार आहे. २००३, २०१५ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यांच्या वेळी शाही स्नानासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. आगामी सिंहस्थाच्या निमित्ताने पुन्हा धार्मिक पर्वाची प्रतीक्षा सुरू झाली आहे. शनिवारी सकाळी ७ वाजता गोदावरीपात्रात गंगापूजन करून कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर संत एकनाथ महाराजांच्या जुन्या नाथमंदिरातून मोक्षघाटाकडे मिरवणूक काढण्यात येईल. सकाळी १० वाजता मोक्षघाटावर मुख्य धार्मिक विधींना प्रारंभ होईल, तर १०:३० वा. ध्वजारोहण होणार आहे. पैठण येथील कुंभमेळा आणि शाही स्नानाच्या परंपरेला संदर्भ आहेत. सातवाहन काळात देशभरातील साधुसंतांना निमंत्रण देऊन कृष्णकमळ तीर्थावर धार्मिक विधी पार पाडले गेल्याचे दाखले मिळतात. ब्रह्मचारी दंडास्वामी, संत एकनाथ महाराज, संत भानुदास महाराज आणि जगद्विख्यात पंडित गागाभट्ट यांच्याशी संबंधित संदर्भ या परंपरेच्या कथनात आहेत. नगराध्यक्षा विद्या कावसानकर यांनी परिसरात सुशोभीकरणाचे नियोजन केले आहे. महंत बळीराम महाराज जोगस, दिनेश पारिख आणि पवन लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली वेदी सजावट, मंडप उभारणी व विधींची तयारी पूर्ण केली आहे. पहिले शाही स्नान सोमवार २ ऑगस्ट २०२७, दुसरे शाही स्नान मंगळवार ३१ ऑगस्ट २०२७, तिसरे शाही स्नान रविवार १२ सप्टेंबर २०२७, ध्वजावतरण सोमवार २४ जुलै २०२८ रोजी पार पडणार आहे. लाखो भाविक पैठणमध्ये दाखल होणार असल्याने पायाभूत सुविधा, घाट स्वच्छता, भाविकांच्या निवास-वाहतुकीच्या सोयी आणि नियोजनबद्ध व्यवस्थापन यावर नगर परिषदेने लक्ष केंद्रित केले आहे.
Source link
नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळा:गंगापूजन, मिरवणूक, धार्मिक विधींनी पैठणच्या मोक्षघाटावर आज ध्वजारोहण, 31 फुटी खांबावर 15 फुटांचा ध्वज फडकवणार