Headlines

तीन दिवसीय आयोजन:वडनेर आश्रमशाळेत क्रीडा स्पर्धा; 15 शाळांमधील 1100 खेळाडू सहभागी




आदिवासी विकास विभागाच्या छत्रपती संभाजीनगर प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ८ शासकीय आणि ७ अनुदानित अशा एकूण १५ आश्रमशाळांच्या तीन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांना वडनेर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत गुरुवारी सुरुवात झाली आहे. प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांच्या हस्ते क्रीडाध्वजारोहण आणि क्रीडाज्योत प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले. स्पर्धांमध्ये विविध आश्रमशाळांचे ११०० खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी लेखाधिकारी केवलसिंग सुंदर्डे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी बानेश्वर भगत, उद्धव वायाळ, सचिन पोटभरे, वैद्यकीय अधिकारी अभिषेक राठोड, एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पवनराजे सोनवणे, पंचायत समिती सदस्य कचरू सावंत, सरपंच मुलचंद पवार, राजू मोरे, वत्सला मोरे आणि कडुबा मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. याशिवाय प्रकल्पांतर्गत सर्व आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, क्रीडा मार्गदर्शक, शिक्षक, विद्यार्थी खेळाडू आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमप्रसंगी आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन करत प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. ढोल-ताशांचा गजर, क्रीडांजलीचे सूर आणि उपस्थितांच्या टाळ्यांच्या कडकडाटात मैदानावर क्रीडा स्पर्धांचा रंगतदार प्रारंभ झाला. या प्रकल्पस्तरीय स्पर्धांमध्ये कबड्डी, खो-खो, रिले, व्हॉलीबॉल, भालाफेक, गोळाफेक, उंच उडी आणि लांब उडी अशा विविध मैदानी व शारीरिक कौशल्याच्या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील आणि आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना आपले सुप्त क्रीडाकौशल्य दाखवण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. प्रास्ताविक मुख्याध्यापक किशोर वारे यांनी केले. त्यांनी क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. सूत्रसंचालन सहयोग जावळे यांनी तर आभार प्रियंका शेवाळे यांनी मानले. या भव्य प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी व नियोजनबद्ध आयोजनासाठी वडनेर येथील आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत. खेळामुळे मानसिक बळ, निर्णयक्षमता वाढीस चालना ः प्रकल्प अधिकारी चेतना मोरे प्रकल्प अधिकारी चेतना मोरे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासातच नव्हे तर मैदानावर उतरून खेळांमध्येही सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. खेळामुळे केवळ शारीरिक तंदुरुस्तीच मिळत नाही, तर मानसिक बळ व निर्णयक्षमताही दृढ होते. हार-जीत हा कोणत्याही खेळाचा एक स्वाभाविक भाग असतो; मात्र मैदानावर खेळताना दाखवलेली जिद्द, चिकाटी आणि खिलाडूवृत्ती अधिक महत्त्वाची ठरते. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थी खेळाडूंमध्ये प्रचंड गुणवत्ता असून त्यांनी या संधीचे सोने करून विभागीय, राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपल्या भागाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *