![]()
कन्नड तालुक्यातील धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा हा तालुक्यातील नागरिक आणि पशुधनासाठीच आरक्षित ठेवण्यात यावा, या मागणीसाठी रायभान जाधव विकास आघाडीच्या वतीने माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. ३०) तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिशोर नाका ते तहसील कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला होता. तहसील कार्यालयासमोर झालेल्या सभेत हर्षवर्धन जाधव म्हणाले की, तालुक्यातील ४ लाख ५० हजार ग्रामीण लोकसंख्या, ६० हजार शहरी लोकसंख्या आणि १ लाख २७ हजारहून अधिक पशुधनाची पाण्याची गरज पाहता १७.४८ एम एम क्युब पाण्याची आवश्यकता आहे. सध्या धरणांमध्ये २४.६३ एम एम क्युब पाणी उपलब्ध असल्याने हे पाणी केवळ कन्नडसाठीच राखीव ठेवावे, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अवचित वळवळे यांचेही भाषण झाले. याप्रसंगी शिष्टमंडळाने तहसीलदार सारिका भगत यांच्या नावे निवेदन सादर केले. हे निवेदन नायब तहसीलदार प्रशांत काळे व दिलीप कुमार सोनवणे यांनी स्वीकारले. त्यानंतर डिसेंबरपर्यंत तालुक्यातील पाणी राखीव ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली जाईल, असे लेखी पत्र तहसीलदारांनी शिष्टमंडळाला दिले. सभेचे प्रास्ताविक रायभान जाधव विकास आघाडीचे तालुकाध्यक्ष राजू तुपे यांनी केले, सूत्रसंचालन प्रशांत सोनवणे यांनी तर आभार राजेंद्र हार्दे यांनी मानले. या मोर्चाला राजेंद्र हारदे, दीपक शेजवळ, दयानंद बनकर, सूर्यभान दहेतकर, अविनाश घुले, गणेश ठोकळ, सुनील निकम, गणेश जाधव यांच्यासह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
कन्नडमधील पाणी तालुक्यातील जनतेसाठी राखीव ठेवण्याची मागणी:माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसीलवर धडक मोर्चा