Headlines

दुष्काळात तेरावा महिना!:विमा आणि पीयूसी अभावी आरटीओच्या मेसेजने उडाली वाहनधारकांची झोप; दुष्काळग्रस्त शेतकरी नव्या संकटात




वाढत्या महागाईने आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. अशातच आता ‘दुष्काळात तेरावा महिना’ या म्हणीचा प्रत्यय वर्धेकरांना येत आहे. परिवहन विभागाने (RTO) रस्ते सुरक्षा आणि मोटार वाहन कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी कडक पावले उचलली असून, विमा आणि प्रदूषण प्रमाणपत्र (PUC) नसलेल्या वाहनधारकांना थेट कारवाईचे मेसेज पाठवल्याने नागरिकांची चांगलीच झोप उडाली आहे. आरटीओचा मेसेज आणि वाहनधारकांत घबराट केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या (MoRTH) नावाने वाहनधारकांच्या मोबाईलवर थेट संदेश येत आहेत. “वाहनाचा विमा आणि प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) नूतनीकरण न केल्यास तुमच्या वाहनाची नोंद परिवहन विभागाच्या ‘कायमस्वरूपी अभिलेखात’ टाकण्यात आली आहे. विमा आणि प्रदूषण प्रमाणपत्राशिवाय वाहन चालविणे हा मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा आहे. पुढील प्रक्रियेसाठी आरटीओशी संपर्क साधा,” असा हा इशाऱ्याचा संदेश आहे. प्रशासकीय दृष्टिकोनातून आरटीओने आपले काम अत्यंत योग्य पद्धतीने केले असले तरी, या थेट मेसेजमुळे वाहनधारक प्रचंड धास्तावले आहेत. वाहनधारकांच्या अडचणींकडे दुर्लक्ष अनेक वाहनधारकांनी जाणीवपूर्वक विमा किंवा पीयूसी काढलेले नाही असे नाही. काहींची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने, तर काहींची वाहने अनेक दिवसांपासून घरातच धूळ खात पडून असल्याने त्यांनी कागदपत्रांचे नूतनीकरण केलेले नाही. अशा नागरिकांना आधीच आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असताना, केवळ भीतीदायक संदेश पाठवून प्रश्न सुटणार आहे का? असा सवाल नागरिक विचारत आहेत. प्रशासनाने केवळ कारवाईचा बडगा उगारण्याऐवजी दंडाची तरतूद आणि वाहन पुन्हा नियमित करण्याचे मार्ग स्पष्टपणे सांगण्याची गरज आहे. शेतकऱ्यांसमोर उभे राहिले नवे संकट कायदा आणि सुव्यवस्थेसाठी आरटीओची ही कारवाई आवश्यक असली, तरी या मोहिमेचा सर्वाधिक फटका आधीच निसर्गाच्या लहरीपणाने आणि दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतात पाणी नाही, हाती आलेले पीक गेले आहे आणि शेतकऱ्याच्या खिशात दमडीही उरलेली नाही. अशा भयावह आर्थिक संकटाशी सामना करताना, शेतीच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर किंवा दुचाकीचा विमा आणि पीयूसीसी काढण्यासाठी हजारो रुपये आणायचे कुठून? हा मोठा प्रश्न बळीराजासमोर उभा राहिला आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे आणि कर्जाचे हप्ते फेडणे कठीण झाले असताना, आरटीओच्या या दंडात्मक मेसेजमुळे आधीच खचलेला शेतकरी आता आणखी एका नव्या आर्थिक आणि मानसिक संकटात सापडला आहे. ————— हेही वाचा.. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभपर्व सुरू:राष्ट्रपती मुर्मू, CM फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा; एकनाथ शिंदेसह सुनेत्रा पवार, गिरीश महाजनांची उपस्थिती
नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये आजपासून एका ऐतिहासिक आणि मंगलमय पर्वाची सुरुवात झाली आहे. देशाचे आणि जगाचे लक्ष लागून असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा आज दुपारी १२ वाजून २ मिनिटांच्या अभिजित मुहूर्तावर विधीवत शुभारंभ झाला आहे. नाशिकच्या रामकुंडावर आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर एकाच वेळी धर्मध्वजारोहण पार पडले असून, भाविकांच्या अलोट गर्दीने गोदाकाठ दुमदुमून गेला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक दिग्गज नेते या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार होत आहेत. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *