Headlines

उजनी धरणावर 2 हजार मेगावॅटचा सौर प्रकल्प उभारणार:1800 मेगावॅट बॅटरी साठवण आणि एआय डेटा सेंटरही प्रस्तावित; 2800 कायमस्वरूपी रोजगारांचा दावा




उजनी धरण परिसरात २ हजार मेगावॅट क्षमतेचा फ्लोटिंग सोलार प्रकल्प, १ हजार ८०० मेगावॅटची बॅटरी साठवण व्यवस्था आणि एआयवर आधारित डेटा सेंटर उभारण्याचे नियोजन आहे. प्रकल्पासाठी राज्य सरकारने १६ एप्रिल २०२६ रोजी सामंजस्य करार केला. प्रकल्पामुळे पाणी वापर, जमीन संपादन आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबाबत प्रशासनाने माहिती दिली आहे. १.४ गिगावॅट क्षमतेचे एआय डेटा सेंटरही प्रस्तावित आहे. उजनी जलाशयाच्या पूर्ण संचय पातळीवरील ३३ हजार ६३० हेक्टरपैकी ३ हजार हेक्टरवर सौर प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. उर्वरित ९१ टक्के जलाशय खुला राहील, असे प्रशासनाने सांगितले. पहिल्या टप्प्यात भीमानगर-रांझणी (ता. माढा), तरटगाव आणि हिंगणगाव (ता. इंदापूर) येथील ४१५.७५ एकर सरकारी जमीन वापरली जाईल. दुसऱ्या टप्प्यात वन विभागाची मान्यता मिळाल्यास आणखी १७४ एकर जमीन वापरण्यात येईल. अन्य खासगी किंवा सरकारी जमीन संपादित करण्याचे नियोजन नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. भीमानगरमध्ये जलसंपदा विभागाच्या जागेवर राहणाऱ्या ३११ कुटुंबांना ५१.१८ एकर जमीन विनामोबदला देण्यात आली आहे. त्यामुळे कोणतेही कुटुंब विस्थापित होणार नाही, असा प्रशासनाचा दावा आहे. प्रकल्पासाठी सहा टीएमसी पाणी लागणार असल्याची चर्चा प्रशासनाने फेटाळली. दरवर्षी ०.४२ टीएमसी पाणी लागेल आणि कमाल वापर ०.५ टीएमसीपर्यंत राहील, असे सांगण्यात आले. डेटा सेंटरमध्ये पाणी वापरून शीतकरण करण्याऐवजी ‘क्लोज्ड लूप डायरेक्ट टू चिप’ तंत्रज्ञान वापरण्यात येईल. प्रक्रिया केलेले सांडपाणी जलाशयात किंवा नदीत सोडले जाणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले. या प्रकल्पातून २ हजार ८०० कायमस्वरूपी आणि ४० हजार प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाला दरवर्षी सुमारे १८० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. फ्लोटिंग सोलारमुळे बाष्पीभवन कमी होऊन वर्षाला सुमारे १.५ टीएमसी पाण्याची बचत होईल, असा दावा आहे. ग्रीन हायड्रोजन आणि लघु मॉड्युलर अणुभट्टीवर आधारित प्रकल्पांचा प्रस्तावात समावेश नसल्याचे प्रशासनाने सांगितले. पर्यावरण आणि जैवविविधतेसाठी आवश्यक मान्यता मिळाल्यानंतरच पुढील काम होईल. स्थानिक नागरिकांच्या शंकांना उत्तरे देण्यासाठी स्वतंत्र समन्वयक नेमला जाईल. गावनिहाय प्रतिनिधींच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधण्यात येणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *