![]()
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जागावाटप करताना साताऱ्याच्या राजकीय ताकदीपेक्षा महायुतीतील एकजुटीला अधिक महत्त्व दिले. जिल्ह्यात सर्वाधिक मतदानाची क्षमता असूनही युतीतील घटक पक्षांमध्ये समतोल राहावा, यासाठी कमी जागांवर समाधान मानावे लागले. जिल्हा परिषद निवडणुकीतील संघर्षाची पुनरावृत्ती टाळण्याचे वरिष्ठांचे स्पष्ट निर्देश होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोपविलेली समन्वयाची जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडली, असे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान सुरू असताना शिवेंद्रसिंहराजे यांनी मतदान केंद्राला भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी जागावाटपामागील राजकीय गणित उलगडले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांमध्ये निर्माण झालेला संघर्ष जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पुन्हा उफाळू नये, यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू होते. राज्यात महायुतीचे सरकार एकत्रितपणे काम करत असताना जिल्ह्यातही त्याच पद्धतीने राजकीय समन्वय राखणे आवश्यक होते. त्यामुळे काही ठिकाणी स्वतःची राजकीय ताकद असूनही तडजोडीची भूमिका स्वीकारावी लागली, असे त्यांनी सांगितले. सातारा तालुक्यात मतदानाचा आकडा सर्वाधिक असतानाही जागावाटपात त्या प्रमाणात प्रतिनिधित्व न घेता अन्य घटकांनाही संधी देण्यात आली. हा निर्णय राजकीय समतोल राखण्याच्या व्यापक भूमिकेतून घेतल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील जागावाटप हे केवळ स्थानिक राजकीय गणित नसून महायुतीची एकजूट टिकविण्याच्या रणनीतीचा भाग असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले.
Source link
महायुतीचा धर्म पाळण्यासाठी साताऱ्यात जागांवर पाणी सोडले:शिवेंद्रराजेंचे स्पष्टीकरण, वरिष्ठांच्या सूचनेनुसार राजकीय तडजोड केल्याची कबुली