Headlines

पुण्यातील टेकड्यांवरील डोंगरकटाई रोखण्यासाठी वंदना चव्हाण आक्रमक:महापालिका आयुक्तांना पत्र, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी




पुण्यातील टेकड्यांवर सुरू असलेली डोंगरकटाई आणि अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी महापालिकेने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी माजी खासदार आणि माजी महापौर वंदना चव्हाण यांनी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, असे पत्र त्यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे. चव्हाण यांनी महापौर मंजुषा नागपुरे यांची भेट घेऊन पत्रातील मुद्द्यांची माहिती दिली. या वेळी डोंगरकटाईबाबत वारंवार तक्रारी करणारे आणि संबंधित भागांतील नागरिक उपस्थित होते. बाणेर टेकडी, बिबवेवाडी, सुतारदरा येथील एआरएआय परिसर, कात्रज, कोंढवा आणि सिंहगड रस्ता या भागांत मोठ्या प्रमाणावर डोंगरकटाई होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी कारवाईनंतर काम थांबते; मात्र काही दिवसांनी, विशेषतः सुट्ट्यांच्या काळात, ते पुन्हा सुरू होते, असे चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे. अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे रोखण्यासाठी शासनाचे निर्णय, महापालिकेचे आदेश आणि महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमातील तरतुदी आहेत. संबंधित अधिकाऱ्यांची वैयक्तिक जबाबदारी निश्चित करण्याची तरतूदही कायद्यात आहे. तरीही नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे. संबंधित ठिकाणांची पाहणी करावी, बांधकामांच्या परवानग्यांची माहिती द्यावी आणि आतापर्यंत केलेल्या कारवाईचा लेखी अहवाल सादर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. डोंगरकटाई पुन्हा होऊ नये यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांची निश्चिती करून कायमस्वरूपी देखरेख यंत्रणा उभारण्याची मागणीही त्यांनी केली. पुण्याच्या टेकड्या, नैसर्गिक परिसंस्था आणि पर्यावरण हा शहराचा सार्वजनिक ठेवा आहे. त्यांचे संरक्षण करणे ही नागरिकांसोबतच महापालिका प्रशासनाचीही कायदेशीर आणि संस्थात्मक जबाबदारी असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे. ———— हेही वाचा.. पुण्यात एफडीएची मोठी कारवाई: गायत्री लाडू भांडारचा 1,188 किलो लाडू-बुंदीचा साठा जप्त, 1.73 लाखांचा साठा नष्ट; अन्न परवाना निलंबित
सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या मिठाई उत्पादकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा बडगा उगारला आहे. कोंढवा बुद्रुक येथील टिळेकर नगरमधील मेसर्स गायत्री लाडू भांडार या मिठाई उत्पादन व साठा केंद्रावर धाड टाकून तब्बल 1 हजार 188 किलो मोतीचूर लाडू आणि बुंदीचा साठा जप्त करण्यात आला. भेसळयुक्त अथवा अपमिश्रित असल्याचा संशय असलेला हा सुमारे 1 लाख 73 हजार 700 रुपयांचा साठा प्रशासनाने जागेवरच नष्ट केला. तसेच संबंधित उत्पादनाचा अन्न परवानाही तातडीने निलंबित करण्यात आला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *