![]()
ऐन नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे मोठे संकट ओढवले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले अत्यंत तीव्र ‘मुरासू’ चक्रीवादळ वेगाने किनारपट्टीच्या दिशेने सरकत असून, त्याचा थेट परिणाम आता महाराष्ट्राच्या वातावरणावर दिसू लागला आहे. अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या इशाऱ्यानुसार, पुढील 4 ते 5 दिवस म्हणजेच 5 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज 3 नोव्हेंबर रोजी राज्यातील तब्बल 20 जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी पावसाचा अंदाज असून, 7 जिल्ह्यांना थेट वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. 7 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; 20 जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज 3 नोव्हेंबर रोजी राज्यातील अनेक भागांत ताशी 30 ते 60 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. विजांसह पावसाची शक्यता असणारे जिल्हे रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांत अंशतः ढगाळ हवामान राहून वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात जोरदार वाऱ्यांचा तडाखा आज मराठवाड्यातील लातूर, नांदेड, धाराशिव आणि परभणी परिसरात वाऱ्याचा वेग जास्त राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी शेतातील काढणीला आलेली पिके सुरक्षित स्थळी हलवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘मुरासू’ चक्रीवादळ धडकणार; ताशी 120 किमी वेगाने वारे वाहणार बंगालच्या उपसागरात घोंघावणारे ‘मुरासू’ चक्रीवादळ अत्यंत भीषण रूप धारण करत किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकत आहे. हे चक्रीवादळ आज मंगळवारी सकाळी ओंगोलच्या दक्षिणेकडे असलेल्या नेल्लोर आणि नरसापूरदरम्यान आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची (Landfall) शक्यता आहे. लँडफॉलच्या वेळी किनारपट्टीवर ताशी 110 ते 120 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. सोमवारी सायंकाळपूर्वीच्या अवघ्या 6 तासांमध्ये या वादळाने ताशी 14 किलोमीटर वेगाने पश्चिम-वायव्य दिशेने आगेकूच केली होती. दक्षिण भारतातील 5 राज्यांत हाहाकार या चक्रीवादळाचा थेट फटका आंध्र प्रदेश (रायलसीमा व किनारपट्टी भागात सलग 2 दिवस अतिमुसळधार), तेलंगण, तमिळनाडू (7 नोव्हेंबरपर्यंत), ओडिशा (4 नोव्हेंबरपर्यंत) आणि केरळ (7 व 8 नोव्हेंबर) या राज्यांना बसणार असून तिथे रेड व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस; इंदापुरात 130 mm अतिवृष्टीची नोंद राज्यात आधीच पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सोमवारी रात्रीपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे तब्बल 130 मिलिमीटर, तर बारामती येथे 80 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून या दोन्ही तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. इतर भागांतील पावसाची आकडेवारी पुणे शहरात 40 मिमी, पुरंदर येथे 30 मिमी, तर चिंचवडमध्ये 20 मिमी पाऊस झाला. याशिवाय सातारा, कोल्हापूर, वेल्हे, वडगाव मावळ, दौंड, शिरूर, घोडनदी आणि महाबळेश्वर येथे प्रत्येकी 10 मिलिमीटर पाऊस पडला. तापमानात मोठी घट; रत्नागिरीत कमाल 36.7 अंश, तर गोंदियात पारा 17.4 अंशांवर पावसाळी वातावरण आणि ढगांच्या आच्छादनामुळे राज्यातील तापमानात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत रत्नागिरी येथे राज्यातील सर्वाधिक 36.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ अमरावती येथे 34.6 अंश, डहाणू येथे 34.3 अंश आणि अकोला येथे 34.0 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. विदर्भातील गोंदिया येथे राज्यातील सर्वात कमी म्हणजेच 17.4 अंश सेल्सिअस नीचांकी तापमानाची नोंद झाली असून, तिथे रात्री गारवा जाणवत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 4 आणि 5 नोव्हेंबरदरम्यानही मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहून वादळी पाऊस सुरूच राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी, विशेषतः वाहनचालक आणि शेतकऱ्यांनी विजेच्या खांबांखाली किंवा झाडांखाली आश्रय न घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ————————————————————– हेही वाचा… माझ्याकडे चार नाही, अनेक ऑडिओ क्लिप्स: वेळ आल्यावर आणखी बॉम्ब फोडणार, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला थेट इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता राज्य सरकार आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांना थेट आणि इशारा दिला आहे. “माझ्याकडे फक्त चार ऑडिओ क्लिप्स नाहीत, तर अशा अनेक क्लिप्स आहेत. जर सरकारने आमच्याविरोधात सुरू असलेले हे षडयंत्र थांबवले नाही, तर मी लवकरच आणखी काही ऑडिओ बॉम्ब फोडणार आहे,” असा खळबळजनक इशारा जरांगे यांनी दिला आहे. सविस्तर वाचा
Source link
‘मुरासू’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरही परिणाम:कोकण, मराठवाड्यासह 20 जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा; 7 जिल्ह्यांना यलो अलर्ट; IMDचा हायअलर्ट!