Headlines

पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट!:विरोधकांकडून घातपाताची भीती व्यक्त करत मीनाक्षी शिंदेंकडून राम पूर्णेकरांसाठी पोलिस संरक्षणाची मागणी




ठाण्यातील मानपाडा परिसरातील शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. या हत्येमागे माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती प्रदीप शिंदे हेच मास्टरमाईंड असल्याचा आरोप करत पूर्णेकर कुटुंबीय आणि विरोधी पक्षांनी त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलने केली आहेत. मात्र, आता या प्रकरणाला एक वेगळेच वळण लागले असून, स्वतः मीनाक्षी शिंदे यांनीच पोलीस आयुक्तांना पत्र लिहून राम पूर्णेकर व त्यांच्या निकटवर्तीयांचे पोलीस संरक्षण वाढवून देण्याची मागणी केली आहे. मीनाक्षी शिंदे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाल्या, दिवंगत प्रदीप पूर्णेकर यांच्या दुर्दैवी आणि दुःखद निधनानंतर, गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील अनेक राजकीय विरोधी पक्ष व नेते या संवेदनशील विषयाचे अत्यंत खालच्या पातळीवर राजकारण करत आहेत. आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, आमदार अनिल परब, माजी खासदार राजन विचारे, उबाठा गटाचे केदार दिघे, काँग्रेस पक्षाचे विक्रांत चव्हाण, मनसे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव व मनसेचे अभिजित पानसे हे सर्व नेते या दुःखद प्रकरणाचा आपल्या राजकीय स्वार्थासाठी गैरवापर करत आहेत. या विरोधकांकडून सत्ताधारी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी विविध मार्गांनी कटकारस्थाने रचली जात आहेत. जनतेमध्ये खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवून समाजमाध्यमांचा गैरवापर केला जात आहे, तसेच जनआंदोलनांच्या नावाखाली आमच्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. एकनाथ शिंदेंची प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न पुढे बोलताना मीनाक्षी शिंदे म्हणाल्या, गेल्या काही दिवसांतील याप्रकरणात विरोधकांची वक्तव्ये पाहिली असता, ती प्रामुख्याने ठाणे शहराची आणि एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशानेच केली जात असल्याचे स्पष्ट होते. या प्रक्षोभक वक्तव्यांमुळे जनतेमध्ये गैरसमज पसरत असून स्थानिक शांतता व कायदा-सुव्यवस्था धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, गेल्या चार-पाच दिवसांत तसे प्रसंगही उद्भवले आहेत. या सर्व प्रकरणात माझ्यावरही विविध प्रकारचे आरोप केले जात आहेत, ज्याचा गैरफायदा घेऊन राजकीय विरोधक कोणत्याही थराला जाऊ शकतात अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. घातपात किंवा अनुचित प्रकार घडण्याची भीती दिवंगत प्रदीप पूर्णेकर यांचे सुपुत्र राम पूर्णेकर व संपूर्ण परिवार सध्या अत्यंत दुःखात आहे. पित्याच्या अकाली निधनाच्या मानसिक आघातातून सावरणे त्यांना कठीण जात आहे. अशा भावनिक व संवेदनशील परिस्थितीत विरोधक या कुटुंबाचा राजकीय फायद्यासाठी वापर करत आहेत. केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी या विरोधकांपैकी कोणीही या दुःखी कुटुंबीयांच्या बाबतीत एखादा घातपात किंवा अनुचित प्रकार घडवून आणू शकते, अशी दाट भीती निर्माण झाल्याचं मिनाक्षी शिंदे यांनी म्हटलं आहे. एकतर्फी नरेटिव्ह पसरवले जात आहेत तसेच, चिंतेची बाब म्हणजे, यातील काही विरोधी नेते मुख्य आरोपींशी संबंधित असल्याचे संकेत व माहिती समोर येत आहे. तसेच, काल विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जी पत्रकार परिषद आयोजित केली होती तिथे आदित्य ठाकरे यांच्यासोबत खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर असलेले काही आरोपीसुद्धा स्पष्टपणे दिसत आहेत. समाजमाध्यमांवर केवळ एकतर्फी नरेटिव्ह पसरवले जात असले, तरी विरोधकांच्या संशयास्पद हालचालींमुळे त्यांच्या हेतूंबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत, असे मीनाक्षी शिंदे यांनी यावेळी म्हटले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *