Headlines

खा. लंकेंचा ‘एकहाती’ विजय; विखे समर्थकांचा 24 मतांनी पराभव:जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणात उलथापालथीचे संकेत, 104 पैकी 64 मते मिळवत राहुल शिंदेंना दिला धक्का




संपूर्ण जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या पारनेर सेवा संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत खासदार नीलेश लंके यांनी एकतर्फी, एकहाती विजय खेचून आणला.त्यांनी त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे यांचे कट्टर समर्थक, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांचा तब्बल २४ मतांनी पराभव केला.१०४ मतांपैकी खासदार लंके यांना ६४ तर शिंदे यांना अवघी ४० मते मिळाली.पालकमंत्री विखे यांच्यासह माजी खासदार विखे यांना हा मोठा राजकीय धक्का मानला जातो. खासदार लंके यांना बँकेत येण्यापासून रोखण्यासाठीच उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांनी बिनविरोध निवडणुकीचा फंडा बाजूला सारून बँकेत निवडणूक घडवून आणल्याची चर्चा निवडणूक प्रक्रियेदरम्यान सुरू होती.किंबहुना केवळ पारनेरच्या जागेवर एकमत न झाल्यानेच जिल्ह्यातील १० जागांवर निवडणूक लादली गेल्याची चर्चा होती. खासदार लंके यांचा बॅंकेच्या संचालक मंडळातील प्रवेश रोखण्यासाठी माजी खासदार विखे यांच्यासह आमदार काशिनाथ दाते, जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रशांत गायकवाड, भारतीय जनता पक्षासह महायुतीतील घटकपक्षांच्या नेत्यांनी कंबर कसल्याचे व शिंदे यांना निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्याचे चित्र मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्पष्टपणे दिसत होते.मात्र,निकालानंतर महायुतीची मते मोठ्या प्रमाणावर फुटली असल्याचे स्पष्ट झाले. सत्ता समीकरणात उलथापालथ? खासदार लंके यांच्यासह विरोधी सहकार परिवर्तन मंडळाच्या नवनिर्वाचित संचालकांची संख्या वाढली असल्याने‌ जिल्हा बँकेत सत्ता स्थापनेसाठी जुळवण्यात आलेल्या समीकरणांमध्ये उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकतर्फी विजयाचे इंगित विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे आपल्या पारनेर तालुक्यातील समर्थकांची तीन मते खासदार लंके यांच्या पारड्यात टाकणार असल्याची चर्चा निवडणूक प्रक्रियेदरम्यान सुरू होती.या चर्चेला निवडणूक निकालानंतर दुजोरा मिळाला.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही मदत खासदार लंके यांना झाली.त्यांच्या पक्षाचे सचिव राम रेपाळे पारनेरमध्ये खासदार लंके यांच्यासाठी दोन दिवस तळ ठोकून होते.माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीही खासदार लंके यांच्या विजयासाठी मोर्चेबांधणी केली.या सर्वाचा एकत्रित परिणाम खासदार नीलेश लंके यांच्या एकतर्फी विजयात झाला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *