Headlines

दादा असताना अर्थखाते आपल्याकडे होते, आताही राष्ट्रवादीलाच हवे- सुनील तटकरे:रोहित पवारांवरही टीकास्त्र, म्हणाले- त्यांनी स्वतःचा चेहरा बघावा




राज्यातील दुष्काळी परिस्थिती, विकासकामांसाठी मिळणारा निधी आणि पक्षांतर्गत संघटनात्मक बांधणी या विषयांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाची मंगळवारी बैठक पार पडली. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत, राज्याचे अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडेच असावे, अशी मागणी आमदारांकडून करण्यात आली आहे. या बैठकीनंतर खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधत बैठकीतील निर्णयांची माहिती दिली आणि आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांचाही समाचार घेतला. दिवाळीनंतर राष्ट्रवादीचे नेते दुष्काळी दौऱ्यावर राज्यावरील दुष्काळाच्या संकटावर तटकरे म्हणाले, “राज्यात भयावह दुष्काळी संकट आले आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळी संपल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार आणि विधानपरिषद सदस्य राज्यभर दुष्काळी दौरे सुरू करणार आहेत. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस वेगवेगळ्या जिल्ह्यांत जाऊन नुकसानीची पाहणी, पंचनाम्यांचा आढावा आणि अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जातील. शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मिळणाऱ्या मदतीचा आढावा घेतला जाईल.” अर्थखाते राष्ट्रवादीलाच देण्याची आमदारांची मागणी विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची खंत आमदारांनी या बैठकीत व्यक्त केली. तसेच राज्याचे अर्थ आणि नियोजन खाते राष्ट्रवादीलाच मिळावे, अशी मागणी त्यांनी केली. यावर बोलताना तटकरे म्हणाले, “आमदारांची ही मागणी स्वाभाविक आहे. ज्यावेळी आम्ही मोदी आणि अमित शहांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये गेलो आणि दादांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सहभागी झालो, तेव्हा राज्याचा वित्त आणि नियोजन विभाग राष्ट्रवादीकडे, म्हणजेच दादांकडे होता. त्यामुळे आताही हे खाते पक्षाला मिळाले पाहिजे, अशी भूमिका आमदारांनी मांडली आहे. सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली आमदारांना अधिक भरघोस निधी कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘रोहित पवारांनी स्वतःचा चेहरा आरशात बघावा’ राष्ट्रवादीमध्ये सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना एकटे पाडले जात असून, जय पवार आणि पार्थ पवार यांच्यात भाजप नेत्यांच्या मदतीने फूट पाडली जात असल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला होता. यावर पलटवार करताना तटकरे म्हणाले, रोहित पवारांनी आधी आपला चेहरा बघावा. गेल्या नऊ महिन्यांत दादांच्या निधनानंतरची त्यांची वक्तव्ये तपासून पाहावीत, म्हणजे खरा चेहरा कोणाचा काय आहे, ते समजेल. प्रत्येकाचा स्वतःचा चेहरा टीव्हीवर दिसण्यासाठी टीका करण्याचा एक उद्योग असतो, तसाच ते करत आहेत. त्यांच्या वक्तव्याला मी काहीही महत्त्व देऊ इच्छित नाही. महायुतीत कोणताही वाद नाही तटकरे म्हणाले, आमदार हे लोकप्रतिनिधी असतात आणि त्यांना मतदारसंघासाठी निधी हवा असतो. ही भावना सर्वच पक्षांच्या आमदारांची असते. बैठकीत कोणत्याही नेत्यावर किंवा मुख्यमंत्री शिंदे साहेबांवर कोणतीही टीका-टिप्पणी झालेली नाही. आम्ही एनडीएचे आणि महायुतीचे घटक आहोत. महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत करण्यावरच आमचा भर आहे,” असे तटकरे यांनी स्पष्ट केले. —————- हेही वाचा.. कोल्हापुरात स्वाभिमानीचा एल्गार: 21 तासांपासून पुणे-बंगळुरू महामार्ग रोखला, राजू शेट्टींचा इशारा, म्हणाले- तोडगा निघाला नाही तर दूध-भाजीपालाही मुंबईला जाऊ देणार नाही
उसाला योग्य दर मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले आंदोलन आता अधिकच तीव्र झाले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे-बंगळुरू महामार्ग रोखून धरला असून, किणी टोलनाक्यावर नेते राजू शेट्टी यांनी गेल्या २१ तासांपासून ठिय्या मांडला आहे. जोपर्यंत ऊसदराबाबत तोडगा निघत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली असून, आता मुंबईकडे जाणारा भाजीपाला आणि दूधही रोखण्याचा मोठा इशारा त्यांनी दिला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *