Headlines

मुख्य जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्हमधून गळती:मनपा विभागाचे दुर्लक्ष; पाण्याचा अपव्यय




अकोला शहराची तहान भागवण्यासाठी महान धरणावरून पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य ६५ एमएलडी आणि २५ एमएलडीच्या दोन मुख्य भूमिगत जलवाहिन्या महान-अकोला मार्गावर टाकण्यात आलेल्या आहेत. मात्र, या दोन्ही मुख्य जलवाहिन्यांवरील एअर व्हॉल्वमधून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती सुरू आहे. परिणामी, दररोज शेकडो लिटर शुद्ध पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत असून, या गंभीर बाबीकडे अकोला महानगरपालिकेच्या जलसंपदा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर आले आहे. महान ते अकोला दरम्यान मुख्य जलवाहिनीवरील महान मोठा बिहाड माथा, तिवसा येथील सिद्धेश्वर विद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर, तिवसा-दगडपारवाच्या मध्यभागी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर, दगडपारवा दत्त मंदिरासमोर, रेडवा फाट्यासमोर आणि बार्शिटाकळी येथील पुलाच्या कडेला जलवाहिनीच्या एअर व्हॉल्वमधून सतत पाण्याची गळती सुरू आहे. याशिवाय कान्हेरी आणि खडकी येथेही एअर व्हॉल्व लिकेज असल्याने दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. सध्या महान धरणातील जलसाठा वेगाने खालावत असून, पाणीपातळी अवघ्या १३.८५ टक्क्यांवर येऊन पोहोचली आहे. अशा बिकट परिस्थितीत पाण्याचा एक-एक थेंब वाचवणे गरजेचे असताना, जलसंपदा विभागाला मात्र याचे गांभीर्य नसल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वीच बार्शिटाकळी येथे खोदकामामुळे ६५ एमएलडी जलवाहिनी फुटल्याने पुरवठा अडचणीत सापडला होता. धरणात १३.८५% पाणी, तरीही गांभीर्य नाही महान धरणातील पाणीसाठा वेगाने खालावून अवघ्या १३.८५ टक्क्यांवर पोहोचला आहे. आगामी उन्हाळ्याची दाहकता आणि संभाव्य पाणीटंचाई पाहता धरणातून उपसा होणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब जपून शहरापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. मात्र, मुख्य मार्गावरील अर्धा डझनाहून अधिक ठिकाणी व्हॉल्व गळतीकडे दुर्लक्ष हे प्रशासनाची अनास्था दर्शवत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *