![]()
भंडारा जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असून, आता थेट शासकीय अधिकाऱ्यांच्याच जीवाला धोका निर्माण होऊ लागला आहे. मोहाडी तालुक्यातील रोहा येथील वैनगंगा नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकाच्या दिशेने ट्रॅक्टर भरधाव चालवून अधिकाऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना दि. 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता सुमारास समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी वेळीच प्रसंगावधान राखत बाजूला झाल्याने मोठी दुर्घटना टळली. मिळालेल्या माहितीनुसार, रोहा येथील वैनगंगा नदीपात्रात अवैधरीत्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी कारवाईसाठी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी कारवाई सुरू असताना एका ट्रॅक्टर चालकाने अधिकाऱ्यांच्या दिशेने भरधाव ट्रॅक्टर नेला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा बचाव केल्याने अनर्थ टळला. 10 जणांविरुद्ध गुन्हे दाखल या घटनेनंतर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधितांविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे मोहाडी पोलिसांनी १० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात महसूल विभागाने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून शासनाच्या महसुलाचे नुकसान करण्याबरोबरच कारवाईसाठी येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांनाच लक्ष्य करण्याचे धाडस वाळू माफियांमध्ये निर्माण होत असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. शासकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे. वाळू माफियांना कायद्याचा धाक उरला नाही का? कारवाईसाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांच्याच जीवावर बेतण्याची वेळ येत असेल, तर या अवैध धंद्याला नेमके पाठबळ कुणाचे? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आता या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करून वैनगंगा नदीपात्रातील अवैध वाळू उपशाला कायमचा आळा घालण्याचे आव्हान महसूल व पोलीस प्रशासनासमोर आहे. ——— हेही वाचा.. मलकापुरात उसाने भरलेली ट्रॉली पलटी होऊन भीषण अपघात: उसाच्या ढिगाऱ्याखाली दबून 60 वर्षीय महिलेचा मृत्यू, मुलगा गंभीर कराडजवळील मलकापूर शहरात उसाने भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी होऊन एक भीषण दुर्घटना घडली आहे. मलकापुरातील ढेबेवाडी फाट्याजवळ ही घटना घडली असून, पलटी झालेल्या ट्रॉलीखाली दोन दुचाकींसह दोन ते तीन जण अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. उसाच्या ढिगाऱ्यातून पाटण तालुक्यातील एका दुचाकीस्वाराला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. सविस्तर वाचा
Source link
भंडाऱ्यात वाळू माफियांची मुजोरी!:कारवाईसाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर घातला ट्रॅक्टर; 10 जणांविरुद्ध गुन्हे दाखल