कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या अध्यक्ष निवडीवरून पेटलेल्या राजकीय आखाड्याचे लोण आता थेट राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे. 5.5 लाख (साडेपाच लाख) दूध उत्पादक शेतकऱ्यांचा लोकशाही कौल डावलून राज्य सरकारने गोकुळवर 4 शासन
.
दुसरीकडे, गोकुळवर मागील दाराने संचालक घुसवण्याच्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयावर महायुतीतच मोठी दुफळी निर्माण झाली असून सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) या निर्णयावर कमालीची नाराज असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
गोकुळच्या लढाईत आम्ही तुमच्यासोबत!
आमदार सतेज पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकारच्या अध्यादेशाविरोधात न्यायालयीन आणि रस्त्यावरील संघर्षाची घोषणा करताच राजकीय घडामोडींना वेग आला. उद्धव ठाकरे यांनी सतेज पाटील यांना फोन करून परिस्थितीची माहिती घेतली. “साडेपाच लाख शेतकऱ्यांचा जनादेश चिरडण्याचा हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे. ही केवळ एका दूध संघाची निवडणूक नसून महाराष्ट्रातील सहकार आणि लोकशाही वाचवण्याची लढाई आहे. या लढ्यात शिवसेना (उबाठा) तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील,” असा विश्वास ठाकरे यांनी दिला. यापूर्वी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही ट्वीट करून गोकुळमधील सरकारच्या हस्तक्षेपाचा निषेध नोंदवला होता. आता उद्धव ठाकरे यांच्या थेट पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीने हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे.
9 नोव्हेंबरला कोल्हापुरात ‘संघर्ष मोर्चा’
लोकशाही कौल नाकारल्याच्या निषेधार्थ आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरात प्रचंड जनआंदोलनाची हाक दिली आहे. येत्या 9 नोव्हेंबर रोजी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ‘संघर्ष मोर्चा’ काढण्यात येणार आहे.
हजारोंच्या संख्येने उतरण्याचे आवाहन
गोकुळशी जोडलेल्या 5,400 प्राथमिक दूध संस्थांचे प्रतिनिधी आणि हजारो दूध उत्पादक शेतकरी या मोर्चात रस्त्यावर उतरणार आहेत. जनतेने दिलेला 13 जागांचा स्पष्ट कौल बाजूला सारून 4 शासननियुक्त संचालकांच्या माध्यमातून सत्ता बळकावणाऱ्या सरकारला हा थेट इशारा असणार आहे.
महायुतीत दुफळी; 4 संचालकांच्या नियुक्तीवरून शिंदे गट भाजपवर नाराज?
गोकुळ दूध संघावरील या शासकीय अध्यादेशामुळे महायुतीमधील अंतर्गत विसंवाद चव्हाट्यावर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळमध्ये लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सदस्यांचा आणि जनमताचा आदर राखला गेला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना (शिंदे गट) पक्षाने घेतली आहे.
भाजप-राष्ट्रवादीच्या भूमिकेवर असहमती
पराभव समोर दिसत असताना मागील दाराने 4 संचालक नेमून त्यांना मतदानाचा अधिकार देणे ही चुकीची पद्धत असल्याचे मत शिंदे गटातील वरिष्ठ नेत्यांचे आहे. नुकतेच शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनीही ‘चिटिंग करू नका’ असा इशारा देत भाजपवर निशाणा साधला होता. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीच्या या खेळीशी शिंदे सेना सहमत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
25 पैकी 13 जागा जिंकूनही तिढा; 10 नोव्हेंबरच्या अध्यक्ष निवडीकडे लक्ष
गोकुळच्या संचालक मंडळाच्या एकूण 25 जागांपैकी सतेज पाटील यांच्या ‘राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी’ने 13 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे, तर महायुतीच्या वाट्याला 12 जागा आल्या आहेत. सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत थेट मंत्री हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांचे नाव घेत, “या दोघांनीच हे षडयंत्र रचले असून सहकारात मैत्रीऐवजी गद्दारी केली आहे,” असा घणाघाती आरोप केला.
10 नोव्हेंबरची रणनीती
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 10 नोव्हेंबर रोजी अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे. यापूर्वीच 9 नोव्हेंबरला काढण्यात येणाऱ्या संघर्ष मोर्चामुळे कोल्हापुरातील वातावरण चांगलेच तापणार असून, शासननियुक्त संचालकांच्या मतदानाच्या अधिकाराविरोधात न्यायालय काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
—————————————————————————
हेही वाचा…
गोवा-सुरतनंतर उदयपूरच्या मेरियटमध्ये लपवलेत गोकुळचे 12 संचालक: सतेज पाटील म्हणाले- पराभूतांना ‘तज्ज्ञ’ म्हणून मागील दाराने घुसवण्याचा गलिच्छ डाव

“कोल्हापूरच्या साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांनी ‘गोकुळ’ दूध संघात आमच्या 13 जागा निवडून देऊन स्पष्ट जनादेश दिला आहे. मात्र जनतेने नाकारल्यानंतर आणि उच्च न्यायालयात दिलासा न मिळाल्यामुळे सत्ताधारी महायुतीने गोकुळ ताब्यात घेण्यासाठी लोकशाहीचा उघड खून करणारा अध्यादेश काढला आहे. साखर कारखाने आणि जिल्हा बँकांना वगळून केवळ गोकुळवर डोळा ठेवून हा कायदा बदलण्यात आला. ज्या पराभूत उमेदवारांना साडेचार हजार मतदारांनी धुडकावून लावले, त्यांना आता ‘तज्ज्ञ’ म्हणून मागील दाराने (बॅकडोअर एंट्री) संचालक करून मताचा अधिकार देणे ही कसली लोकशाही? हा कसलाही डेडलॉक नसून महायुतीकडून थेट लोकशाहीच डेड (Dead) करण्याचा विकृत प्रयत्न सुरू आहे,” असा घणाघाती आरोप आमदार सतेज (बंटी) पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. येथे वाचा संपूर्ण बातमी