![]()
राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांमधील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पटेल पोहोचले होते. मात्र, या भेटीदरम्यान शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे अलीकडील दिल्ली दौऱ्याबाबत विचारणा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे या भेटीला केवळ सदिच्छा भेट न मानता राजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्व प्राप्त झाले आहे. शरद पवार यांना बुधवारी प्रकृतीच्या कारणास्तव मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. दरम्यान, गुरुवारी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाली. या चर्चेत राज्यातील तसेच देशातील सध्याच्या राजकीय घडामोडींचाही आढावा घेण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटातील प्रमुख नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना सुरुवात झाली होती. त्यातच आता प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी पटेल यांच्याकडे अमित शाह यांच्या भेटीसाठी केलेल्या दिल्ली दौऱ्याबाबत विचारणा केली. या दौऱ्याचा उद्देश काय होता आणि बैठकीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे. प्रफुल्ल पटेल म्हणाले, शरद पवारांची प्रकृती उत्तम शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत समाधान व्यक्त केले. पवार साहेबांची प्रकृती चांगली असून ते पूर्णपणे फिट आहेत. त्यांनी नेहमीच्या आपल्या खास शैलीत विचारपूस केली. सध्या काय सुरू आहे आणि राजकारणात कोणत्या घडामोडी घडत आहेत, याबाबत आमच्यात चर्चा झाली. त्यांची प्रकृती अतिशय उत्तम आहे, असे पटेल यांनी सांगितले. मात्र, अमित शाह यांच्या भेटीबाबत शरद पवार यांनी नेमके काय विचारले आणि त्यावर प्रफुल्ल पटेल यांनी काय उत्तर दिले, याचा तपशील त्यांनी माध्यमांसमोर दिलेला नाही. त्यामुळे या भेटीत झालेल्या राजकीय चर्चांबाबत उत्सुकता कायम आहे. अमित शाह यांच्या भेटीने राष्ट्रवादीत चर्चांना सुरुवात 1 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ यांच्यासह पक्षातील महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती, पक्षाची आगामी वाटचाल आणि भविष्यातील राजकीय रणनीती यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, या बैठकीतील चर्चेचा अधिकृत तपशील समोर आला नव्हता. या संपूर्ण घडामोडींमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची अनुपस्थिती. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्याशिवाय अमित शाह यांची भेट घेतल्याने राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले. पक्षातील निर्णयप्रक्रिया, नेतृत्व आणि आगामी राजकीय भूमिका यावरून काही मतभेद आहेत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. दिल्ली दौऱ्यानंतर सुनेत्रा पवारांनी घेतली आमदारांची बैठक दिल्लीतील भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातही बैठकांचे सत्र सुरू झाले. सर्वप्रथम पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीत आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील प्रश्न, अडचणी आणि पक्षाच्या संघटनात्मक परिस्थितीबाबत भूमिका मांडली. पक्षातील अंतर्गत संघर्षामुळे संघटना कमकुवत होत असल्याची चिंता काही आमदारांनी व्यक्त केल्याची माहिती समोर आली होती. पक्षात समन्वय वाढवण्याची गरज असून वरिष्ठ नेत्यांमध्ये एकमत असणे आवश्यक असल्याचे मतही व्यक्त करण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अमित शाह यांच्यासोबत झालेली बैठक, त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी घेतलेली आमदारांची बैठक आणि आता प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट, या घटनांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीमुळे राजकीय समीकरणांची चर्चा एकेकाळी शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय अंतर निर्माण झाले. अशा परिस्थितीत पटेल यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतल्याने या भेटीची चर्चा होणे स्वाभाविक आहे. या भेटीमुळे दोन्ही गटांमध्ये पुन्हा काही राजकीय संवाद सुरू होणार का, याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, सध्या तरी ही भेट शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस आणि राजकीय घडामोडींवरील चर्चेपुरतीच असल्याचे प्रफुल्ल पटेल यांच्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील अंतर्गत घडामोडी, दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत झालेल्या बैठका आणि दोन्ही राष्ट्रवादी गटांमधील संबंध यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात कोणती नवी समीकरणे तयार होतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. हेही वाचा…. शंभूराज देसाईंचे केंद्राकडे बोट, शिवेंद्रसिंहराजेंनी मांडले कारखान्यांचे आर्थिक गणित:मात्र साडेचार हजारांच्या ऊसदराच्या मागणीवर शेतकरी ठाम, महामार्गावरील आंदोलन थांबेना! ऊसदराच्या प्रश्नावरून सातारा जिल्ह्यात शेतकरी आंदोलन चांगलेच पेटले असून, पुणे-बंगळूर महामार्गावरील रास्ता रोको आंदोलन अद्याप सुरूच आहे. प्रतिटन 4,500 रुपये ऊसदर आणि इथेनॉलला प्रतिलिटर 70 रुपये दर मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. आंदोलन मागे घेण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू असले, तरी शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि कारखानदारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. मात्र, शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला दराचा ठोस निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे आश्वासनांवर आंदोलन मागे घेणार नसल्याचे स्पष्ट करत संघटनेने महामार्गावरील लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सविस्तर वाचा….
Source link
प्रफुल्ल पटेल यांनी घेतली शरद पवारांची रुग्णालयात भेट:अमित शहांच्या दिल्ली दौऱ्याबाबत साहेबांनी केली विचारणा, राजकीय चर्चांना उधाण