![]()
सध्या दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन सर्वांनी अनावश्यक खर्च टाळून काटकसरीने दिवाळी साजरी करावी. तसेच फटाके वाजवताना दक्षता घेऊन पर्यावरणपूरक सण साजरा करावा आणि आपल्या समृद्ध संस्कृतीचे जतन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने मातीचे किल्ले बनवावेत, असे आवाहन शिक्षक संदीप रासकर यांनी केले. दीपावली सणाचे औचित्य साधून स्थानिक बाल विद्या मंदिर, राहुरी येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष ‘आकाशकंदील निर्मिती कार्यशाळा’ अत्यंत उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत इयत्ता दुसरी ते चौथीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आपल्या कल्पकतेने रंगीबेरंगी आणि आकर्षक आकाशकंदील साकारले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, हस्तकलेची आवड निर्माण व्हावी तसेच स्वतःच्या हाताने वस्तू तयार करण्याचा आनंद अनुभवता यावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कागद, काठ्या व विविध सजावट साहित्याचा सुरेख वापर करत सुंदर आकाशकंदील तयार केले. कार्यक्रमादरम्यान राहुरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी कार्यशाळेला सदिच्छा भेट दिली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आकाशकंदिलांचे त्यांनी विशेष कौतुक करून चिमुकल्यांना शाबासकी दिली. शाळेचे मुख्याध्यापक गुलाब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली. या उपक्रमासाठी अलका आढाव, सविता साखरे, नंदा काळे, सुनीता शेटे, जयश्री पाटोळे, मीना बर्डे, सुनीता बारसे, नानासाहेब पवार, बाळासाहेब राठोड आणि संदीप रासकर आदी शिक्षक-शिक्षिकांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारी ही कार्यशाळा पालक व नागरिकांमध्ये कौतुकाचा विषय ठरली आहे. यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शाळेतील शिक्षकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
पर्यावरणपूरक अन् पारंपरिक पद्धतीने दिवाळीचा सण साजरा करा- रासकर:राहुरीतील शाळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी घडवले आकाशकंदील