Headlines

संजय राऊतांनी आधी भांडुपमधून नगरसेवक निवडून आणून दाखवावा:नागपूरच्या भाजप मोर्चाला काँग्रेसपेक्षा दुप्पट गर्दी, उजनीतील ऊर्जा प्रकल्पाला विरोध अयोग्य- बन




ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याआधी भांडुपमधील आपल्या प्रभागातून किमान एक नगरसेवक निवडून आणून दाखवावा, असा टोला भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी लगावला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी भाजपचे प्रदेश दौरा प्रमुख अमोल कविटकर आणि पुष्कर तुळजापूरकर हेदेखील उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत नवनाथ बन यांनी गोकुळ दूध संघातील सत्तासंघर्ष, पदवीधर निवडणूक, राज ठाकरे यांची टीका, महायुतीतील समन्वय आणि विविध विकास प्रकल्पांवर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. नवनाथ बन म्हणाले की, नागपूरमधील भाजपच्या मोर्चाला काँग्रेसच्या मोर्चाच्या तुलनेत दुप्पट गर्दी झाली होती. राहुल गांधी यांनाही स्वतःच्या सभांना एवढी गर्दी जमवता आली नाही. देशातील जनतेचा पूर्ण विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच आहे. त्यामुळे देशात नेपाळ किंवा बांगलादेशसारखी अराजकतेची परिस्थिती निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘गोकुळ’ दूध संघ मराठी माणसाच्याच हातात राहील नवनाथ बन म्हणाले की, गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी कायद्यानुसार 14 सदस्यांचा कोरम आवश्यक आहे. परंतु सध्याच्या संख्याबळामुळे हा कोरम पूर्ण होत नसल्याने बैठक घेण्यात अडचण येत आहे. हा नियम काँग्रेसच्या काळातच झालेला असून यात भाजपचा कोणताही हस्तक्षेप नाही. ही परिस्थिती अशीच राहिल्यास तिथे पुन्हा प्रशासक नेमला जाऊ शकतो किंवा फेरनिवडणूक होऊ शकते. मात्र, गोकुळ दूध संघ गुजरातला जाणार नसून तो सदैव मराठी माणसाच्याच हातात राहील, असा दावा त्यांनी केला. महायुतीत कोणताही अंतर्गत वाद नाही नवनाथ बन म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना बन यांनी त्यांना 2019 मधील राजकीय घडामोडींचा इतिहास तपासण्याचा सल्ला दिला. 2019 मध्ये मनसेच्या सातपैकी सहा नगरसेवकांना उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षात फोडले होते, तेव्हा राज ठाकरे यांची नीतिमत्ता कुठे गेली होती? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, पुणे पदवीधर निवडणुकीतील पराभवाबाबत भाजप आत्मचिंतन करत असून वरिष्ठ स्तरावर बैठका झाल्या आहेत. महायुतीत कोणताही अंतर्गत वाद नसून सर्व काही सुरळीत असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. विकास प्रकल्पांना पाठिंबा नवनाथ बन म्हणाले की, उजनी धरणातील पाण्याचा वापर करून राबवल्या जाणाऱ्या ‘पंप स्टोरेज’ आणि ऊर्जा निर्मिती प्रकल्पाला होणारा विरोध अयोग्य आहे. प्रत्येक नवीन विकासकामाला विरोध करण्याची प्रवृत्ती थांबली पाहिजे. या प्रकल्पाच्या अंतर्गत 20 ते 23 हजार झाडे लावण्याचे नियोजन आहे. तसेच, हिंदूंच्या सणांवेळीच पर्यावरणाचा मुद्दा उपस्थित करून त्यांना लक्ष्य केले जाते. बकरी ईदच्या वेळी पर्यावरणवाद्यांची चिंता कुठे जाते? असा सवाल केला. तर राणा सूर्यवंशी प्रकरणात पोलिस योग्य ती कारवाई करतील, कोणाकडे पुरावे असल्यास त्यांनी ते द्यावेत, ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *