![]()
महाराष्ट्र भीषण दुष्काळात होरपळत असताना राज्य सरकारकडून मदतीच्या घोषणांचा सुकाळ झाला आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यातील दुष्काळ मात्र हटलेला नाही. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सरकारकडून सरसकट आणि भरघोस मदतीची अपेक्षा होती. मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असल्याची घणाघाती टीका युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली. शिवसेनेचे (उबाठा) तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांच्या पुढाकारातून पारनेर येथे सुरू करण्यात आलेल्या शेतकरी मदत केंद्राचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी झाले. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसैनिकांनी खांद्याला खांदा लावून उभे राहावे असे आवाहन ठाकरे यांनी केले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सुनील शिंदे, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, ज्येष्ठ नेते डॉ. भास्कर शिरोळे, किसन सुपेकर आदी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांना ही मदत मिळाली याचा हिशेब सरकारने द्यावा. शेतकऱ्यांचे ट्रॅक्टरचे हप्ते थकले आहेत, मुलांच्या शाळा आणि महाविद्यालयांचे शुल्क भरायचे आहे, शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडायचे आहे. अशा परिस्थितीत पाच हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांसाठी पुरेशी आहे का, असा सवाल ठाकरे यांनी केला. शेतकरी मदत केंद्र केवळ माहिती गोळा करण्यापुरते मर्यादित राहणार नसून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळवून देण्यासाठी काम करणार आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी शिवसैनिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ठाकरे यांनी केले. सरकारकडून जाहीर होणारी मदत कागदावर किंवा बॅनरवर दिसण्याऐवजी शेतकऱ्यांच्या बांधावर आणि त्यांच्या बँक खात्यात पोहोचली पाहिजे. मदत प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचते की नाही, याची खातरजमा केली जाईल. त्यासाठी स्थानिक प्रशासकीय अधिकारी, आमदार, खासदार आणि मंत्र्यांना जाब विचारण्याची भूमिका शिवसेनेने घेतली असल्याचे ठाकरे म्हणाले.
Source link
सरकारकडून घोषणांचा सुकाळ, शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळ:आदित्य ठाकरेंचा घणाघात; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसैनिकांना आवाहन