Headlines

मुंबईत गाईचे दूध काढताना नक्षलवाद्यास बेड्या ठोकल्या:न्यायालयाकडून 3 दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर




झारखंडमध्ये तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांच्या हाती बंदुका सोपवणारा आणि १० लाख रुपयांचे बक्षीस असलेला कुख्यात नक्षलवादी कमांडर चक्क डोंबिवलीत एका गोठ्यात गाईचे दूध काढण्याचे काम करत असल्याचे उघडकीस आले आहे. संजय सरोज यादव ऊर्फ ‘बुधारामाजी’ असे या माओवादी कमांडरचे नाव असून, ठाणे व झारखंड एटीएसने संयुक्त कारवाई करत त्याला ठाकुर्लीतून अटक केली. गजबजलेल्या शहरात परराज्यांतील गुन्हेगार आश्रय घेत असल्याच्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. झारखंडच्या पहेलू परिसरातील देवगण गावचा रहिवासी संजय यादव हा माओवादी संघटनेचा ‘सब झोनल कमांडर’ होता. नक्षलवादी चळवळीत तरुणांना ओढून शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देणे, हे त्याचे मुख्य काम होते. झारखंड पोलिसांचा ससेमिरा वाढल्याने तो पळून महाराष्ट्रात आला. एका हमालाच्या आणि कँटीन चालकाच्या मदतीने त्याने ठाकुर्लीच्या (चोळेगाव-खांबलपाडा) एका बिल्डरच्या गोठ्यात आश्रय घेतला. तिथे तो आपली खरी ओळख लपवून गायींची देखभाल व दूध काढण्याचे काम करत होता. संजयविरुद्ध झारखंडमध्ये ‘यूएपीए’ या कठोर कायद्यांतर्गत अजामीनपात्र वॉरंट जारी झाले होते. तो ठाकुर्लीत लपल्याची पक्की माहिती मिळताच वागळे इस्टेट आणि झारखंड एटीएसने संयुक्त सापळा रचून त्याला पकडले. पोलिसांनी त्याला ठाणे न्यायालयात हजर केले. आरोपीचे वकील अ‍ॅड. मनीष उज्जैनकर यांच्या युक्तिवादानंतर, न्यायालयाने संजयला झारखंडला नेण्यासाठी ३ दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर केली आहे. ओळखपत्रावर संशय संजयला काम मिळवून देणारा कँटीन चालक राजेश सिंग याने सांगितले की, संजय थेट गावातून पिशवी घेऊन आला होता. एक सर्वसामान्य मजूर समजून त्याला गोठ्यात काम देण्यात आले. त्याने स्वतःचे एक ओळखपत्रही दाखवले होते, मात्र ते बनावट असल्याची कोणालाच शंका आली नाही. आता पोलिस त्या बनावट ओळखपत्राचा आणि त्याच्या संभाव्य कटाचा कसून तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *