Headlines

दिवाळीचा ‘एक्सप्रेस'' वेग:पुणे-अहिल्यानगर महामार्गावर 24 तासांत 4 पटीने वाहतूक वाढली




दिवाळीच्या सणासाठी मुंबई-पुण्यातील चाकरमाने गावाकडे परतत असल्याने अहिल्यानगरमार्गे जाणाऱ्या महामार्गावर विक्रमी गर्दी उसळली आहे. गेल्या २४ तासांत या मार्गावरील वाहनांची संख्या चक्क ४ पटीने वाढली आहे. शनिवार पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. महामार्गावरील महाकोंडीला कंटाळून अनेक प्रवाशांनी चारचाकीऐवजी दुचाकी प्रवासाला पसंती दिली. नोकरी, व्यवसाय आणि उच्चशिक्षणासाठी पुणे-मुंबईत स्थायिक झालेले लाखो नागरिक मराठवाडा आणि विदर्भाकडे रवाना होत आहेत. अहिल्यानगर हे मध्यवर्ती केंद्र असल्याने या सर्व प्रवाशांचा भार नगर शहरातून जाणाऱ्या बाह्य व अंतर्गत रस्त्यांवर पडत आहे. महामार्गावरील खड्डे यंदा बुजवण्यात आल्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी वाहनांच्या अफाट संख्येमुळे शहरातील कोठला चौक आणि डीएसपी चौक येथे दिवसभर वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. नेहमी सणासुदीच्या काळात कुटुंब आणि सामानासह चारचाकीने गावी जाणाऱ्या प्रवाशांनी यंदा रणनीती बदलली आहे. पुणे, चाकण, शिक्रापूर व शिरूर या पट्ट्यात तासन्‌तास होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तरुण चाकरमान्यांनी थेट दुचाकीवरून प्रवास सुरू केला आहे. दुचाकीमुळे कोंडीतून सहज मार्ग काढता येतो. शिवाय, वेळेची बचत होत असल्यामुळे आणि वाढत्या इंधनखर्चाला कात्री लागत असल्याने अनेकांनी दुचाकीचा पर्याय स्वीकारला आहे. रविवारी दुपारी ३ नंतर वाहतुकीचा ‘पीक अवर’ रविवारी लक्ष्मीपूजन असल्याने पहाटेपासून दुपारपर्यंत खासगी वाहने आणि एसटी बसची गर्दी आणखी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत महामार्गावर वाहतुकीचा सर्वोच्च ताण राहण्याची शक्यता आहे. पर्यायी मार्ग: यवत-दौंड मार्गाने प्रवास करा पुणे-अहिल्यानगर महामार्गावर शिरूर आणि शिक्रापूर पट्ट्यात भीषण वाहतूक कोंडी होत आहे. हा खोळंबा टाळण्यासाठी पुण्याकडून अहिल्यानगर किंवा मराठवाड्याकडे जाणाऱ्या प्रवाशांनी हडपसर-यवत-दौंड-श्रीगोंदा मार्गाचा वापर करावा. या पर्यायी मार्गामुळे अंतर काहीसे वाढले तरी महामार्गावरील तासन्‌तास चालणाऱ्या कोंडीतून सुटका होऊन प्रवासाचा वेळ वाचेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *