Headlines

विद्यार्थी, वृद्धांच्या चेहऱ्यावर फुलवला दिवाळीचा आनंद:वलगाव पोलिसांचा ‎माणुसकीचा उपक्रम




दिवाळी म्हटली की घराघरांत दिव्यांची रोषणाई, मिठाई आणि फराळाची रेलचेल असते. मात्र, समाजातील प्रत्येकालाच सणाचा हा आनंद आपल्या कुटुंबासोबत साजरा करता येतो असे नाही. अशा घटकांच्याही आयुष्यात दिवाळीचा गोडवा पोहोचावा, या भावनेतून वलगाव पोलिसांनी पुढाकार घेतला. नया अकोला येथील चिल्ड्रेन फेलोशिप शाळेतील विद्यार्थ्यांसह वलगाव येथील संत गाडगेबाबा वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना मिठाई, फराळाचे वाटप करून पोलिसांनी दिवाळीचा आनंद साजरा केला.सणासुदीत मुलांना, वृद्धाश्रमातील वृद्धांना आनंदाचे काही क्षण मिळावेत, हा यामागील उद्देश होता. पोलिसांचे पथक शाळेत पोहोचताच विद्यार्थ्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.मिठाई, फराळ मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांची भेट घेऊन त्यांनाही फराळाचे वाटप करण्यात आले. या वेळी वृद्धांशी संवाद साधत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. पोलिस म्हटले की कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे रोखणे आणि नागरिकांचे संरक्षण करणे, अशी त्यांची ओळख आहे. मात्र, या जबाबदाऱ्यांसह समाजातील गरजूंच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांच्याशी नाते जोडण्याचे कामही वलगाव पोलिसांनी यातून केले.पोलिसांच्या या भेटीमुळे विद्यार्थ्यांना वृद्धाश्रमातील वृद्धांना सणाचा आनंद घेता आला. त्यांच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. यात पोलिस निरीक्षक रिता उईके, सहाय्यक निरीक्षक अशोक शिर्के, उपनिरीक्षक भारती मामनकर, प्रदीप शहाणे, संजय काळे, ईशय खांडे, किरण पाठे, शेखर नेमाने, धनिष्ठा शिरभाते व कविता राठोड उपस्थित होत्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *