Headlines

यंदा आमच्याकडे दिवाळी नाही..:अजित गेल्यानंतर आज पहिल्यांदाच दिवाळी सुनी-सुनी, राजेंद्र पवारांनी जागवल्या बालपणीच्या आठवणी




जानेवारी महिन्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या झालेल्या अकाली आणि अनपेक्षित निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. त्यांच्या निधनानंतरची ही पहिलीच दिवाळी आहे. पवार कुटुंबीय अद्याप या दुःखातून सावरलेले नसून त्यांनी यंदा सण साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी स्पष्ट केले की, “यंदा आमच्याकडे दिवाळी नाही. यावेळी आम्ही दिवाळी साजरी करणार नाही. यंदा पहिल्यांदाच अजित पवारांविना दिवाळीचा सण येतोय. त्यामुळे, कुटुंबीयांना मोठं दु:ख असल्याने यंदा पवार कुटुंबीय दिवाळी साजरी करणार नाही.” दरवर्षी बारामतीतील गोविंदबागेत मोठ्या उत्साहात साजरा होणारा दिवाळी पाडवा हा राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय राहिला आहे. या दिवशी राज्यभरातून असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेतेमंडळी आवर्जून शरद पवारांच्या भेटीसाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. मात्र, अजित पवारांच्या निधनामुळे कुटुंबावर ओढवलेल्या दुःखाच्या सावटामुळे यंदा या परंपरेला खंड पडणार आहे. अजित पवारांविना येणाऱ्या या पहिल्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कुटुंबातील सदस्यांकडूनही तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत. एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी एक जुना व्हिडीओ शेअर करत अत्यंत भावनिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आमराईत एकत्र घालवलेल्या लहानपणीच्या दिवसांना उजाळा दिला असून, कुटुंबातील सध्याचे दुरावत चाललेले वातावरण आणि त्यांच्या आठवणी याबाबत दुःख व्यक्त केले आहे. अजित गेल्यानंतर आज पहिल्यांदाच दिवाळी.. राजेंद्र पवार यांनी सोशल मीडियावर लिहिले की, अजित गेल्यानंतर आज पहिल्यांदाच दिवाळी सुनी-सुनी वाटतेय. लहानपणापासूनच्या एकत्रित दिवाळ्या खूप जिव्हाळ्याच्या होत्या. तासेब(अनंतराव) फटाके आणत, सर्वांना समान वाटून देत. फटाके दिवसभर पुरवून वापरण्यासाठी अंधाऱ्या कोठडीतील घडवंचीवरील पोत्याच्या भकश्यात कोणाला सापडू नये म्हणून आपण लपवून ठेवत होतो. त्यावेळी नवीन असलेले पॅराशूट उडाले की ते पकडायला काट्या-कुट्यातून धावत होतो, अर्धवट उडालेल्या फटाक्यांची दारू एकत्र करून दुसर्‍या दिवशी पेटवत होतो. पुढे राजेंद्र पवार यांनी लिहीले की, आजीच्या धाकाने आपले घरदार सुतासारखे सरळ चालत होते, आता तू असतास तर वेगळा धाक व प्रेम राहिले असते. दिवाळीला ND पाटील (आत्यामुळे मामा) आले की घर गप्पांनी भरून जाई. ते वेगळ्या पक्षाचे, स्वतःच्या वैयक्तिक तत्त्वांचे पण त्यांचे प्रत्येक वयातील व्यक्तीशी जमायचे. पक्ष व आपले तत्व हे वेगळे ठेवून नाती जपायची असतात हे शिकलो, असेन लिहीत त्यांनी आठवणींना उजाळा दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *