![]()
वैजापुरातील रोहित पठारे हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी सोमवारी (दि. ९) आणखी ६ जणांना बेड्या ठोकल्या. अविनाश ऊर्फ अनिकेत पोपट होंड, ज्ञानेश्वर सीताराम वडाळकर, प्रतीक कैलास साळुंके, रोहित मच्छिंद्र आहेर, संकेत आदिनाथ आहेर आणि तुषार आदिनाथ आहेर (सर्व रा. वैजापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विधिसंघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेतले असून, अटक आरोपींची संख्या १६ झाली आहे. विशेष म्हणजे, आरोपी आंतरजिल्ह्यात लपून बसल्याचे पोलिसांनी म्हटले असले, तरी त्यांना कोणत्या जिल्ह्यातून पकडले, याचा खुलासा केला नाही. गुन्हेगारी टोळ्यांचा माग काढण्याचा अनुभव, खबऱ्यांचे मजबूत नेटवर्क आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्याची पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांची कार्यशैली या शोधमोहिमेत महत्त्वाची ठरल्याची चर्चा आहे. रोहितच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर पँथरचे दीपक केदार यांनी आंबेडकर पुतळ्यासमोर वाहनावर उभे राहून भाषण केले. आरोपींची धिंड काढून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. सुमारे अर्धा तास चाललेल्या भाषणामुळे परिसरात गर्दी वाढली. रोहितला बर्फ फोडण्याच्या टोच्याने जखमी करून पाणी मागितल्यावर लघवी पाजल्याचा कुटुंबीयांचा आरोप अंगावर शहारे आणणारा आहे. मात्र, या आरोपांना वैद्यकीय अहवाल, साक्षीदार किंवा अन्य पुराव्यांचा आधार मिळाला आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रोहित पठारे हत्याकांडानंतर महाराष्ट्रातील विविध दलित संघटनांचे पदाधिकारी दररोज वैजापुरात पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन न्यायासाठी आवाज उठवत आहेत. पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. या हत्याकांडाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी संघटनांनी लावून धरली आहे. वाढत्या दबावामुळे पोलिस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Source link
रोहित हत्याकांड; 6 जणांना बेड्या:वैजापूरात रक्तरंजित घटनाक्रम, अमानुष छळ केल्याचा कुटुंबीयांचा आरोप