Headlines

नागपुरात 42 आगींनंतर फटाक्यांवर निर्बंध:बाजारपेठा, गर्दीची ठिकाणे आणि इमारतींच्या गच्चीवर रॉकेट, स्काय शॉट उडवण्यास 30 नोव्हेंबरपर्यंत बंदी




नागपुरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी २४ तासांत ४२ हून अधिक आगी लागल्यानंतर महापालिकेने फटाक्यांवर निर्बंध घातले आहेत. शहरातील बाजारपेठा, गर्दीची ठिकाणे आणि इमारतींच्या गच्चीवरून रॉकेट, स्काय शॉट आणि हवेत उडणारे फटाके उडवण्यास ३० नोव्हेंबरपर्यंत बंदी आहे. नागपूर महानगरपालिकेच्या शहरी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (यूडीएमए) हा आदेश काढला. आयुक्त आणि यूडीएमएचे अध्यक्ष डॉ. विपीन यांनी त्यावर स्वाक्षरी केली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लागलेल्या आगींमध्ये सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. रॉकेट आणि स्काय शॉटमधून उडालेल्या ठिणग्यांमुळे या आगी लागल्याचे आदेशात म्हटले आहे. ज्वलनशील पदार्थ इमारतींच्या छतावर, झोपडपट्ट्यांमध्ये, भंगार दुकानांमध्ये, गोदामांमध्ये, पेट्रोलपंपांवर किंवा वाहनांवर पडल्यास आग लागण्याचा धोका असल्याचेही नमूद आहे. महापालिका हद्दीत इमारतींच्या गच्ची, टेरेस, बाल्कनी, रिफ्युजी एरिया, अरुंद रस्ते, झोपडपट्ट्या, दाट लोकवस्तीची निवासी क्षेत्रे, बाजारपेठा आणि वाहनतळ परिसरात या फटाक्यांना बंदी आहे. शहराची रचना, उंच इमारती, दाट लोकवस्ती, व्यावसायिक आस्थापने आणि ज्वलनशील पदार्थांचा साठा असलेली ठिकाणे लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे आदेशात म्हटले आहे. हे निर्बंध ९ ते ३० नोव्हेंबर २०२६ या काळात लागू राहतील. नागपूर पोलीस आयुक्तालय आणि महापालिकेच्या अग्निशमन विभागाला आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. नियम मोडणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या कलम ५१ ते ६० आणि भारतीय न्याय संहितेतील संबंधित तरतुदींनुसार कारवाई होईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *