![]()
सरकारी कार्यालयांमध्ये स्वच्छता आणि शिस्त राखण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. मात्र, जळगाव जिल्ह्यातील जामनेर तहसील कार्यालयात याच्या अगदी उलट चित्र पाहायला मिळाले. कार्यालयातील अस्वच्छता, भिंतींवर मारलेल्या गुटख्याच्या पिचकाऱ्या, छताला लागलेली जाळी आणि स्वच्छतागृहात पडलेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्या पाहून मंत्री गिरीश महाजन यांचा पारा चढला. परिस्थिती पाहून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. इतकेच नव्हे, तर प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी स्वतः हातात झाडू घेत कार्यालयाची स्वच्छता करण्यास सुरुवात केली. मंत्र्यांनीच झाडू हाती घेतल्याचे पाहून उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. स्वच्छतागृहात दारूच्या बाटल्या, कार्यालयात सर्वत्र घाण दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर सरकारी कार्यालयांमध्ये कामकाज सुरू होत असताना जामनेर तहसील कार्यालयातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यालयाला भेट दिली असता त्यांना परिसरात सर्वत्र अस्वच्छता आढळली. कार्यालयाच्या छताला आणि कोपऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जाळी साचली होती. भिंतींवर गुटख्याच्या पिचकाऱ्या मारलेल्या होत्या, तर ठिकठिकाणी कचरा आणि रिकामे पुडे पडलेले होते. विशेष म्हणजे, कार्यालयातील स्वच्छतागृहात देशी दारू आणि संत्रा दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या. सरकारी कार्यालयाच्या आवारात अशा प्रकारे दारूच्या बाटल्या सापडल्याने महाजन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कार्यालयाची नियमित स्वच्छता केली जाते की नाही, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला. अधिकाऱ्यांना सुनावले; महाजनांनी स्वतः घेतला झाडू कार्यालयाची अवस्था पाहिल्यानंतर गिरीश महाजन यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जाब विचारला. नागरिकांकडून स्वच्छतेची अपेक्षा करणाऱ्या सरकारी यंत्रणेने स्वतःच्या कार्यालयाचीही योग्य काळजी घेतली पाहिजे, असे त्यांनी सुनावले. कार्यालयाची इमारत चांगली आणि सुंदर बांधून दिलेली असताना तिची स्वच्छता राखण्याची जबाबदारी प्रशासनाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यालयातील जाळी आणि अस्वच्छता पाहून महाजन यांनी स्वतः झाडू हातात घेतला. त्यांनी स्वच्छता करण्यास सुरुवात केल्यानंतर उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली. मंत्र्यांनी स्वतः स्वच्छतेसाठी पुढाकार घेतल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही कामाला लागावे लागले. ‘अधिकाऱ्यांना थोडेफार तरी वाटले पाहिजे’ या प्रकाराबाबत बोलताना गिरीश महाजन यांनी आपली नाराजी स्पष्ट शब्दांत व्यक्त केली. ते म्हणाले, “मी आज तहसील कार्यालयात गेलो असता तिथली परिस्थिती पाहून मला अत्यंत वाईट वाटले. कार्यालयात गेल्यानंतर डोक्याला जाळ्या लागतात, एवढ्या मोठ्या प्रमाणात अस्वच्छता होती. कार्यालयातील जाळ्यादेखील कोणी काढत नाही. हे पाहून मला राग आला आणि मी स्वतः हातात झाडू घेतला.” पुढे बोलताना त्यांनी स्वच्छतागृहात दारूच्या बाटल्या आढळल्याचा उल्लेख केला. तहसील कार्यालयात अनेक ठिकाणी थुंकून ठेवण्यात आले होते. संपूर्ण कार्यालयात जाळ्या झालेल्या होत्या. एवढे सुंदर कार्यालय बांधून दिलेले असताना त्याची स्वच्छता राखणे हे अधिकाऱ्यांचे काम आहे. अधिकाऱ्यांना याबाबत थोडेफार तरी वाटले पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी आपली खंत व्यक्त केली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी महायुतीची बैठक; 90 टक्के जागांवर एकमत दरम्यान, जामनेर येथील तहसील कार्यालयाच्या पाहणीनंतर गिरीश महाजन यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भातही महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला मंत्री संजय सावकारे, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते. जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या 21 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून, या निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र लढण्याबाबत जागावाटपावर चर्चा करण्यात आली. या निवडणुकीत आतापर्यंत तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामध्ये मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे, पारोळ्याचे आमदार अमोल पाटील यांच्या पत्नी मृणाल पाटील आणि त्यांच्या आई नलिनी पाटील यांचा समावेश आहे. उर्वरित जागांवरील उमेदवारी आणि जागावाटपाबाबत महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. ‘दोन-तीन जागांवर मतभेद, तेही लवकर मिटतील’ बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन यांनी जागावाटपाबाबत सकारात्मक भूमिका मांडली. ते म्हणाले की, महायुतीची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. जवळपास 90 टक्के जागांवर जागावाटपाबाबत एकमत झाले आहे. दोन ते तीन जागांवर काही मतमतांतरे आहेत. मात्र, त्यावरही पुढील एक-दोन दिवसांत तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधकांकडून प्रभावी आव्हान नसल्याचा दावा करत महायुती म्हणून या निवडणुकीत शंभर टक्के यश मिळेल, असे भाकीतही महाजन यांनी केले. त्यामुळे आता जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उर्वरित जागांचे वाटप कसे होते आणि महायुतीतील घटक पक्षांमध्ये कोणता फॉर्म्युला ठरतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. हेही वाचा…. मेकअप आर्टिस्टच्या घरात कोकेनचा साठा:साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त मुंबईत अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोरेगाव परिसरात ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या एका 31 वर्षीय तरुणाला बांगूरनगर पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेला आरोपी मेकअप आर्टिस्ट असून त्याने स्वतःच्या मालाडमधील घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा मोठा साठा लपवून ठेवल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी छापा टाकून हा साठा जप्त केला. या प्रकरणाचा तपास पुढे नेत पोलिसांनी त्याच्या आणखी एका साथीदारालाही अटक केली आहे. दोन्ही आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांसह मुद्देमालाची एकूण किंमत 21 कोटी 13 लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. सविस्तर वाचा….
Source link
तहसील कार्यालयातील अस्वच्छता पाहून गिरीश महाजन संतापले:हाती घेतला झाडू, स्वच्छतागृहात दारूच्या बाटल्या आढळल्या