![]()
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांनी राजकारण तापले असून, काटेवाडी ते ‘वर्षा’ बंगल्यापर्यंत बैठकांचे सत्र सुरू आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावर सस्पेन्स कायम ठेवला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय होणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. शरद पवार गटाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी ‘सुनेत्रा पवार-शरद पवारच अंतिम निर्णय घेऊ शकतील’ असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात लवकरच होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिवाळी पाडव्यानिमित्त प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काटेवाडीत सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवार यांच्याशी ४५ मिनिटे चर्चा केली.त्यानंतर ‘वर्षा’’वर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले. मात्र, “मुख्यमंत्र्यांची भेट केवळ दिवाळीच्या शुभेच्छांसाठी होती,” असे तटकरेंनी स्पष्ट केले. दुसरीकडे, सुनेत्रा पवारांनी “वेळ येईल तशा गोष्टी नक्कीच कळतील,” असे म्हणत उत्सुकता ताणून धरली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी अनौपचारिक गप्पांत स्पष्ट केले की, “विलीनीकरणाबाबत शरद पवार आणि सुनेत्रा पवारच सांगू शकतात, कारण अजितदादा आणि सुनेत्रा पवारांच्या कामात फरक आहे. मात्र, भाजपला विश्वासात घेतल्याशिवाय विलिनीकरण होणार नाही.’ दबावाचे राजकारण की नवे समीकरण तयार होणार अजित पवार गटाला कोणताही मोठा निर्णय घेताना भाजपची संमती घेणे अनिवार्य आहे. दुसरीकडे, विलीनीकरणाच्या चर्चा केवळ पार्थ पवारांवर दबावाचे राजकारण आहे की नवीन समीकरण उदयास येणार, हे शरद पवार-प्रफुल्ल पटेल यांच्या बैठकीनंतर स्पष्ट होऊ शकते.
Source link
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी काटेवाडी ते वर्षा बंगल्यापर्यंत हालचाली:शरद पवार-प्रफुल्ल पटेल यांच्यातील बैठकीकडे सर्वांचे लक्ष