![]()
शिवसेनेचे आमदार आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास काही अज्ञात तरुणांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर शिरसाट यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत थेट छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांवर आणि पोलीस प्रशासनावर भ्रष्टाचाराचे, वसुलीचे आणि गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा अत्यंत गंभीर आणि स्फोटक आरोप केला आहे. नेमका हल्ला कसा झाला? या घटनेची माहिती देताना संजय शिरसाट म्हणाले, “काल रात्री पावणे अकराच्या सुमारास २४ ते २७ वर्षे वयोगटातील तीन अज्ञात मुले गाडीवर आले. माझ्या इथल्या गार्डने त्यांना हटकले असता, एक जण त्याच्या अंगावर गेला. गार्डने ‘तुम्ही प्यायलेले दिसत आहात’ असे सांगून समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते गाडीसह पडले, पुन्हा उठून मागे गेले आणि अत्यंत वेगात गाडी चालवत येऊन त्यांनी माझ्या घरावर बाटल्या फेकल्या. त्यांचा हेतू काय होता, हे माहीत नाही, पण पोलिसांना कळवूनही पोलीस वेळेवर आले नाहीत.” यानंतर स्वतः शिरसाट यांनी रात्री १२ वाजता राज्याच्या पोलीस महासंचालकांना फोन केल्यानंतर रात्री दीड वाजता स्थानिक पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले, असे त्यांनी सांगितले. ‘आयुक्तांना फक्त वसुली आणि क्रीम पोस्ट हवीये’ स्थानिक पोलिसांच्या कारभारावर अत्यंत गंभीर आरोप करताना शिरसाट म्हणाले, “मी जबाबदारीने सांगतोय की, इथले पोलीस आयुक्त आणि प्रशासन केवळ वसुलीच्या कामात लागले आहेत. शहरात खुलेआम ड्रग्ज मिळतायत, खून होतायत, मुलींची छेडछाड होतेय, पण आयुक्तांचे लक्ष नाहीये. या आयुक्तांना फक्त पिंपरी-चिंचवडला ‘क्रीम पोस्ट’ हवी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे की, त्यांना ती पोस्ट द्या आणि तिथं हाकला, पण या शहराला एक खमक्या पोलीस अधिकारी द्या.” ‘अनेक PI ला वसुलीचे टार्गेट’ शहरातील गुन्हेगारीला पोलिसांचाच आशीर्वाद असल्याचा दावा करत शिरसाट म्हणाले, “कोणताही माईचा लाल पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय शहरात अवैध धंदे करू शकत नाही. अनेक पोलीस निरीक्षकांना वसुलीचे टार्गेट दिलेले आहे. चिरीमिरीचे काम सुरू आहे. ड्रग माफिया आणि गुंड खुलेआम फिरत आहेत, पोलीस फक्त दोन पैसे कमवणाऱ्याला पकडतात आणि मूळ मालकाला सोडून देतात.” ‘३ OSD खिशात असल्याची धमकी’ शिरसाट म्हणाले की, हे हल्लेखोर कोण होते, याचा तपास पोलिसांनी करायला हवा. पण ते मुले ‘माझ्या खिशात ३ OSD आहेत,’ अशी धमकी देत होते. हे OSD कोणाचे आहेत, हा तपासाचा भाग आहे.” दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया पत्रकार परिषदेत दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या राजकीय चर्चेवरही शिरसाट यांनी भाष्य केले. ते म्हणाले, “सध्या राजकारणात काहीही उलथापालथ होऊ शकते. पण माझ्या पक्षाबद्दल बोलायचे तर, असा कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार फक्त एकनाथ शिंदे साहेबांना आहे. जर पूर्वी थोडी ॲडजस्टमेंट झाली असती, तर ही फाटाफुटीची वेळच आली नसती. पण उद्धव ठाकरे ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज.. ———— हेही वाचा.. संभाजीनगरचे पालकमंत्री शिरसाट यांच्या बंगल्याबाहेर 3 मद्यपींचा राडा:दाेन तरुण ताब्यात, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शिरसाटांचा सवाल
शिंदे गटाचे आमदार तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या गोलवाडी येथील बंगल्याबाहेर गुरुवारी (१२ नोव्हेंबर) रात्री ११ वाजेच्या सुमारास ३ मद्यपी तरुणांनी गोंधळ घातल्याची घटना घडली. सातारा पोलिस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून, या प्रकरणी दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. सविस्तर वाचा कॅबिनेट मंत्र्याचंच घर सुरक्षित नाही, तर तिथे सामान्य माणसाचं काय?: मंत्री संजय शिरसाटांच्या घरावरील हल्ल्यावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि सत्ताधारी गटाचे महत्त्वाचे नेते संजय शिरसाट यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकार, गृहविभाग आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कॅबिनेट मंत्र्याचंच घर सुरक्षित नसेल, तर तिथे सामान्य माणसाच्या सुरक्षेचं काय?” असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. सविस्तर वाचा
Source link
पोलीस आयुक्तांचे वसुलीचे टार्गेट, शहरात चिरीमिरीचे काम सुरू:घरावरील हल्ल्यानंतर संजय शिरसाट संतापले, मुख्यमंत्र्यांकडे चांगला CP देण्याची मागणी