Headlines

पुण्यात वैशाली आणि रूपालीचे परवाने निलंबित:तपासणीत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन; पार्सल आणि होम डिलिव्हरी बंद




अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत पुण्यातील एफसी रोडवरील प्रसिद्ध हॉटेल वैशाली आणि रूपाली रेस्टॉरंटवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याचे तपासणीत आढळल्याने या दोन्ही आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत. त्रुटींची पूर्तता करून प्रशासनाची लेखी परवानगी मिळेपर्यंत या दोन्ही ठिकाणी अन्नपदार्थांची विक्री, पार्सल आणि होम डिलिव्हरी करता येणार नाही. अन्न सुरक्षा अधिकारी अजिंक्य उमाप यांनी हॉटेल वैशालीची तपासणी केली. या तपासणीत ९८ पैकी केवळ ५८ गुण मिळाल्याने हॉटेलला नियमांचे पालन न करणाऱ्या श्रेणीत टाकण्यात आले. स्वयंपाकघरातील अपुऱ्या जागेमुळे महिलांच्या स्वच्छतागृहाशेजारी कच्चा माल ठेवण्याचे फ्रीजर, तर पुरुषांच्या स्वच्छतागृहालगत डोसा आणि उत्तप्प्याचा तवा ठेवण्यात आल्याचे आढळले. स्वच्छतागृहासमोरील टेबलावर धुतलेली भांडी ठेवण्यात आली होती. उकडलेले बटाटे, शिजवलेला भात आणि अन्य तयार पदार्थ उघड्या कॉरिडॉरमध्ये ठेवले होते. कच्च्या भाज्या तयार अन्नपदार्थांच्या वर ठेवल्याने अन्न दूषित होण्याचा धोकाही निर्माण झाला होता. याशिवाय कीटकप्रतिबंधक व्यवस्था, तापमान नोंदी, पिण्याच्या पाण्याचा अद्ययावत तपासणी अहवाल आणि प्रशिक्षित पर्यवेक्षकाचा अभाव आढळला. जूनमध्ये सुधारणा नोटीस देऊनही त्रुटी कायम राहिल्याने परवाना निलंबित करण्यात आला. दुसरीकडे, रूपाली रेस्टॉरंटच्या तपासणीत असुरक्षित स्वयंपाकघर, अस्वच्छ परिसर, साचलेले पाणी आणि कचऱ्याचे अयोग्य व्यवस्थापन आढळले. कच्चा माल आणि तयार पदार्थ झाकून न ठेवणे, लेबलिंग व वापरण्याची अंतिम तारीख नसणे, तापमान नियंत्रणाच्या नोंदी आणि आवश्यक प्रशिक्षणाचा अभाव अशा त्रुटीही निदर्शनास आल्या. सहआयुक्त श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. सर्व त्रुटी दूर करून पुनर्तपासणीत नियमांचे पालन सिद्ध केल्यानंतरच या दोन्ही रेस्टॉरंटना व्यवसाय सुरू करण्याची लेखी परवानगी मिळू शकणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *