![]()
तिवसा शहरातील पाणीपुरवठ्यासह विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तिवसा शहर समितीच्या वतीने नगरपंचायतीवर धडक मोर्चा काढण्यात आला आहे. या वेळी पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण करणे, कामाचा दर्जा राखणे आणि नागरिकांच्या इतर समस्यांचे निराकरण करण्याची मागणी करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या नगरोत्थान योजनेंतर्गत तिवसा शहरासाठी २८ कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये या कामाचे कंत्राट देण्यात आले असून, १८ महिन्यांत काम पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, दोन वेळा सहा-सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली असून, आता फेब्रुवारी २०२७ ही अंतिम मुदत आहे. कामाची संथ गती पाहता या मुदतीतही योजना पूर्ण होण्याबाबत शंका व्यक्त करण्यात आली. पावसाने दडी मारल्याने पारंपरिक जलस्रोत आटण्याच्या मार्गावर असून, आगामी काळात शहरात पाणीटंचाई निर्माण होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली. योजना डिसेंबर २०२६ पर्यंत दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून स्वच्छ पाणीपुरवठा करावा, जनावरांसाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाण्याचे हौद बांधावेत, झालेल्या कामाचे विशेष लेखापरीक्षण करून अहवाल सार्वजनिक करावा, घरकुलाचे प्रलंबित पैसे तातडीने द्यावेत तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना नळजोडणीसाठी अनामत रक्कम भरण्यात सवलत द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्यात. मोर्चानंतर शिष्टमंडळाने नगरपंचायत अध्यक्ष आणि अधीक्षक यांच्याशी चर्चा केली. यावेळी प्रकाश सोनवणे, चंद्रकांत वडस्कर, दिलीप गोहत्रे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Source link
तिवसा नगरपंचायतीवर भाकपचा धडक मोर्चा:पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्याची मागणी