![]()
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उबाठा) आता राजकीय पक्ष राहिलेला नसून बचत गट झाला आहे. या गटाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण कधी होते, याची संजय राऊत वाट पाहत आहेत, असा टोला भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी रविवारी नागपुरात लगावला. विलीनीकरणाच्या चर्चेवरून राऊतांवर टीका करताना बन यांनी काँग्रेस आणि उबाठा यांच्यातील राजकीय संबंधांवरही प्रश्न उपस्थित केले. संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त बन यांनी त्यांना हिंदुत्वाच्या विचारांकडे परतण्याचा सल्ला दिला. ‘आंधी नहीं, तूफान है मोदी’ असे म्हणणाऱ्या राऊतांनी काँग्रेसचे लांगूलचालन सोडून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास ठेवावा, असे ते म्हणाले. राहुल गांधींचे अंधानुकरण थांबवून ‘नेशन फर्स्ट’च्या विचारांशी नाते जोडावे, असे आवाहनही बन यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर टीका करण्याऐवजी राऊतांनी आधी भांडुपमध्ये उबाठाचा नगरसेवक निवडून आणून दाखवावा, असे आव्हान बन यांनी दिले. २०१४, २०१९ आणि २०२४ या तिन्ही निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनतेने फडणवीसांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केल्याचा दावाही त्यांनी केला. छठपूजेच्या मुद्द्यावरूनही बन यांनी राऊतांवर टीका केली. छठपूजा हा हिंदूंचा सण असून, त्याला विरोध आहे का, हे राऊतांनी स्पष्ट करावे, असे ते म्हणाले. उत्तर भारतीय आणि मराठी असा संघर्ष निर्माण करून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करू नये, असेही त्यांनी सांगितले. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात रेल्वे स्थानकांवर मराठी गाणी वाजलीच पाहिजेत, अशी भाजपची भूमिका असल्याचे बन यांनी स्पष्ट केले. समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड आणि मेट्रोसारख्या विकास प्रकल्पांना उबाठाने विरोध केल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधासाठी विरोध करण्याची भूमिका महाराष्ट्राच्या हिताची नाही, असे ते म्हणाले. ‘केम छो वरळी’ आणि ‘जिलेबी फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशा घोषणा देणाऱ्यांनी गुजराती मतदारांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या अस्मितेचे राजकारण करू नये, अशी टीकाही बन यांनी केली. राम मंदिराच्या उद्घाटनाला काँग्रेसच्या दबावामुळे उपस्थित न राहिलेल्या उबाठाला आता राम मंदिरावर बोलण्याचा अधिकार काय, असा सवाल त्यांनी केला. गोदावरीच्या पवित्र परिसराचे ऑइल पेंटने विद्रूपीकरण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि धार्मिक कार्यक्रमांत द्वेष पसरवणाऱ्यांचाही शोध घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. अजित पवारांच्या स्मृतींचे राजकारण करण्याऐवजी रोहित पवारांनी त्यांच्या नियंत्रणातील २५ साखर कारखान्यांना अजितदादांचे नाव द्यावे, असे आव्हान बन यांनी दिले. खंडणी प्रकरणात मुंबई पोलिसांनी सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
Source link
भाजपने उबाठाला बचत गट म्हटले:नवनाथ बन यांचा संजय राऊतांना टोला; हिंदुत्वाकडे परतण्याचे आवाहन, काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची प्रतीक्षा