Headlines

भेदाच्या षड्यंत्राविरोधात लढा उभारण्याचे डॉ. त्रिवेदींचे आवाहन:श्याम जाजू आणि अनुपम त्रिवेदी लिखित ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ @ १००’ पुस्तकाचे प्रकाशन




पुण्यात भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते आणि राज्यसभा सदस्य डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी भेदाच्या षड्यंत्राविरोधात लढा उभारण्याचे आवाहन केले. प्रांत, भाषा, वर्ग आणि जातींमध्ये भांडणे लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. सामाजिक समरसतेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेले काम अद्भुत असल्याचेही त्यांनी सांगितले. दिलीपराज प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ @ १०० : एक शतक संकल्पाचे’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. त्रिवेदी यांच्या हस्ते झाले. भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू आणि अनुपम त्रिवेदी यांनी हे पुस्तक लिहिले आहे. त्याचा मराठी अनुवाद डॉ. स्वाती महाळंक यांनी केला आहे. कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पश्चिम महाराष्ट्र संघचालक नानासाहेब जाधव आणि दिलीपराज प्रकाशनचे संचालक राजीव बर्वे उपस्थित होते. पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या आवारातील भाऊसाहेब चितळे सभागृहात कार्यक्रम झाला. संघावर झालेले आरोप नम्रतेने आणि गंभीरतेने स्वीकारून संघाने समाजात सृजनाचे काम केले, असे डॉ. त्रिवेदी म्हणाले. महाराष्ट्राची भूमी हिंदुत्ववादी संघटनांसाठी नेहमीच सुपीक राहिली आहे, असेही त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांची सेना दिल्लीच्या सत्तेपुढे झुकली नाही; मात्र इटलीच्या सत्तेपुढे शिवसेना दबून गेली, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि आत्मगौरवाची प्रेरणा दिली, असे ते म्हणाले. ब्रिटिशांनी जाती-पातीचे राजकारण करून प्रादेशिक मुद्द्यांवर देशात दुफळी निर्माण केली, असा आरोप त्यांनी केला. ब्रिटिशांनी मनावर लादलेल्या वैचारिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याची गरज असून, स्वातंत्र्याची लढाई अजून पूर्ण झालेली नाही, असे ते म्हणाले. स्वातंत्र्यलढ्यात संघाचा सहभाग काय, असा प्रश्न विचारला जातो. त्यावर काँग्रेसच्या कोणत्या वरिष्ठ नेत्याने लाठी खाल्ली, गोळी झेलली, फाशी घेतली किंवा काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, हे सांगावे, असे आव्हान डॉ. त्रिवेदी यांनी दिले. आपल्याला ‘स्वराज्य’ मिळाले आहे; मात्र ‘तंत्र’ अजून साधलेले नाही. ही वैचारिक लढाई स्वातंत्र्यापेक्षाही मोठी आहे, असे त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *