![]()
गोपाळकृष्ण गोखले (फर्ग्युसन कॉलेज) रस्त्यावरील अतिक्रमणांचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी पुणे महापालिकेने आता पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पदपथांवर झालेले अनधिकृत व्यवसाय, रस्त्यालगत वाढविण्यात आलेली दुकाने आणि त्यामुळे पादचाऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन महापालिकेने या परिसरात अतिक्रमणविरोधी मोहीम हाती घेतली आहे. मात्र, केवळ एक दिवस कारवाई करून उपयोग नाही, तर पुन्हा अतिक्रमणे होणारच नाहीत, अशी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करा, अशा स्पष्ट सूचना महापालिकेचे सभागृहनेते गणेश बिडकर यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणांबाबत स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून सातत्याने तक्रारी करण्यात येत होत्या. त्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने काल या परिसरात मोठी कारवाई केली. या कारवाईनंतर आज सभागृह नेते गणेश बिडकर यांनी अतिक्रमण विभागातील अधिकारी आणि स्थानिक नगरसेवकांसमवेत रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी कारवाईचा आढावा घेतला तसेच भविष्यात पुन्हा अतिक्रमणे होऊ नयेत, यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा केली. यावेळी बिडकर म्हणाले, की केवळ एक दिवस कारवाई करून अतिक्रमणांचा प्रश्न सुटणार नाही. या रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण होणार नाही, यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. महापालिका आयुक्तांशी चर्चा करून यासंदर्भात दूरगामी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या परिसरातील एकही अतिक्रमण शिल्लक राहू नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याबरोबरच त्यावर नियमित देखरेख ठेवण्याचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर असणार आहे.
Source link
फर्ग्युसन रस्त्यावर अतिक्रमण रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना:सभागृह नेते गणेश बिडकर यांची अधिकाऱ्यांसह पाहणी; पुन्हा अतिक्रमण झाल्यास कारवाई