Headlines

मांसाहारी पार्टी प्रकरणी मोर्शीच्या सीओंची चौकशी होणार:सुप्रिया टवलारे यांच्या अध्यक्षतेखाली तीन अधिकाऱ्यांची समिती; निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे




अमरावती जिल्हा प्रशासनाने मोर्शी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पराग वानखडे यांची चौकशी करण्यासाठी तीन अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीत झालेल्या मांसाहारी पार्टी प्रकरणी ही चौकशी होणार आहे. जिल्हा सहआयुक्त आणि चांदूर रेल्वे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे समितीच्या अध्यक्ष आहेत. अचलपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धीरजकुमार गोहाड सदस्य सचिव आहेत. कर आणि प्रशासकीय अधिकारी चेतन ढेवले समितीचे सदस्य आहेत. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी बुधवारी पराग वानखडे यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला. जिल्हाधिकाऱ्यांनी १४ नोव्हेंबरला कारणे दाखवा नोटीस देऊन १६ नोव्हेंबरपर्यंत खुलासा मागितला होता. वानखडे यांचा खुलासा असमाधानकारक आणि वस्तुस्थितीशी जुळणारा नसल्याचे सांगत त्यांना निलंबित करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. टवलारे यांच्या अध्यक्षतेखालील समिती पार्टी प्रकरणाची सविस्तर चौकशी करून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल देणार आहे. शासनाचा निलंबनाबाबतचा निर्णय आणि समितीचा अहवाल यावर पुढील कारवाई ठरेल. दीपावली मिलनच्या नावाखाली पराग वानखडे यांनी नगरपरिषद कार्यालयात रात्रीच्या जेवणाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम सायंकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत झाला. नागरी संहितेचे उल्लंघन झाल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केला. त्यांनी दुसऱ्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांकडे पुरावेही दिले. मोर्शी-वरुडचे आमदार चंदूभाऊ यावलकर यांनी सोमवारी सीओंवर कठोर कारवाईची मागणी केली. पहिली तक्रार मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी येरेकर यांनी वानखडे यांना कारणे दाखवा नोटीस दिली होती. सोमवारी प्रत्यक्ष उपस्थित राहून खुलासा देण्याचे आदेशही दिले होते. मोर्शीच्या १७ सदस्यीय नगरपालिकेत शिवसेना, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेसची सत्ता आहे. नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या गुल्हाने, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे डॉ. प्रदीप कुऱ्हाडे आहेत. भाजप विरोधी बाकांवर आहे. भाजपचे काही नगरसेवक आणि आमदार चंदूभाऊ यावलकर यांच्या तक्रारींमुळे प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील अंतर्गत मतभेदांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. सत्ता पक्ष आणि विरोधकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मतभेद सुरू आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *