![]()
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ मध्ये अमरावती जिल्ह्यातील पार्डी ग्रामपंचायतीने विभागस्तरावर दुसरा, तर एरंडगाव ग्रामपंचायतीने तिसरा क्रमांक मिळवला आहे. पार्डी मोर्शी तालुक्यात, तर एरंडगाव नांदगाव खंडेश्वर तालुक्यात आहे. या ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांना शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी पुरस्कार दिले जाणार आहेत. कठोरा रोडवरील पी.आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे हा कार्यक्रम होईल. यावेळी १० मंत्री आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात ‘दुष्काळावर मात आणि संकल्प समृद्ध गावाचा’ या विषयावर कार्यशाळाही होईल. दुष्काळी परिस्थितीवर मात करून गाव जलसमृद्ध कसे करावे, याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. अमरावती विभागातील मंत्री, पालकमंत्री, खासदार आणि आमदारांना कार्यशाळेसाठी निमंत्रण देण्यात आले आहे. पश्चिम विदर्भातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, खातेप्रमुख, पंचायत समित्यांचे गट विकास अधिकारी आणि सहाय्यक गट विकास अधिकारीही उपस्थित राहतील. पंचायत समित्यांचे खातेप्रमुख, विस्तार अधिकारी, सरपंच, प्रशासक आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनाही बोलावण्यात आले आहे. पुरस्कार मिळवलेल्या ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनाही निमंत्रण दिले आहे. अमरावती जिल्हा परिषद या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विविध कामकाज समित्यांचे अध्यक्ष आणि मान्यवरांचे संपर्क अधिकारी यांची बैठक घेतली. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी त्यांनी निर्देश दिले. मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायतींच्या दुसऱ्या श्रेणीतही अमरावती जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींनी पहिले तीन क्रमांक मिळवले. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील घोडसगावने पहिला, चांदूरबाजार तालुक्यातील बेलोराने दुसरा आणि अचलपूर तालुक्यातील देवगावने तिसरा क्रमांक मिळवला. या ग्रामपंचायतींनाही कार्यक्रमात पुरस्कार दिले जाणार आहेत.
Source link
अमरावतीच्या दोन ग्रामपंचायतींना विभागस्तरीय पुरस्कार:पार्डीला दुसरा, एरंडगावला तिसरा क्रमांक; अन्य श्रेणीत जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींनाही पुरस्कार