![]()
राज्याच्या राजकारणात अर्थखात्यावरून महायुती आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थखाते मिळवण्याची धमक नाही, तसेच काही प्रकरणांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीला ब्लॅकमेल करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अर्थखाते कोणाकडे असावे, याचा निर्णय महायुतीचे वरिष्ठ नेतृत्व घेईल; काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी त्याबाबत चिंता करण्याची गरज नाही, असा टोला पाटील यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस हा महायुतीतील स्वाभिमानी आणि जबाबदार घटक पक्ष आहे. पक्षाचे हित, सन्मान आणि महाराष्ट्राचा विकास या बाबींना प्राधान्य देऊन निर्णय घेण्यास पक्षाचे नेतृत्व सक्षम आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला कोणते खाते मिळावे किंवा मिळू नये, याची चिंता हर्षवर्धन सपकाळ यांनी करण्याची आवश्यकता नाही, असे उमेश पाटील यांनी स्पष्ट केले. काँग्रेसने राष्ट्रवादीच्या खात्यांमध्ये हस्तक्षेप करू नये अर्थखात्याबाबतचा निर्णय हा महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वामधील परस्पर चर्चा आणि समन्वयातून घेतला जाणार आहे. या प्रक्रियेत काँग्रेसने विनाकारण हस्तक्षेप करण्याची गरज नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रावहिनी पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे हित आणि सन्मान जपणारे निर्णय घेतले जातील. महाराष्ट्राच्या विकासाला प्राधान्य देण्याची पक्षाची भूमिका असल्याचेही पाटील यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादीच्या खात्यांवर भाष्य करण्यापेक्षा काँग्रेसने स्वतःच्या पक्षातील संघटनात्मक परिस्थितीकडे लक्ष द्यावे. पक्षाची विस्कटलेली संघटनात्मक घडी बसवण्याला प्राधान्य द्यावे, असा सल्लाही उमेश पाटील यांनी सपकाळांना दिला. त्यामुळे अर्थखात्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद आता महायुती आणि काँग्रेसमधील राजकीय संघर्षाचा विषय बनला आहे. सपकाळांनी नेमका काय आरोप केला होता? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्थखात्यावरील भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. राष्ट्रवादीला अर्थखाते मिळवण्याची धमक नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीशी संबंधित काही प्रकरणांचा आधार घेऊन अर्थखाते स्वतःकडे ठेवत आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. राष्ट्रवादीला अर्थखाते मिळत नसण्यामागे राजकीय दबाव आहे की पक्षाशी संबंधित काही प्रकरणांमुळे मुख्यमंत्री त्यांच्यावर दबाव टाकत आहेत, याचा खुलासा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने करावा, अशी मागणीही सपकाळ यांनी केली होती. अजित पवारांच्या विमान प्रवासावरूनही उपस्थित केले प्रश्न अर्थखात्याच्या मुद्द्याबरोबरच सपकाळ यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान प्रवासाचा आणि विमान अपघाताच्या चौकशीचा मुद्दाही उपस्थित केला. अजित पवार यांनी 104 वेळा चार्टर विमानातून प्रवास केला होता, असे सांगत त्यांच्या अपघातामागे घातपात होता की तो अपघात होता, याबाबत अद्याप चौकशी अहवाल का समोर आलेला नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी विविध स्तरांतून करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या संदर्भात चौकशीची मागणी केली होती. मात्र, या मागणीचे पुढे काय झाले, याबाबत स्पष्टता नसल्याचे सपकाळ म्हणाले. संबंधित विमान कंपनीच्या मालकाचे राजकीय संबंध कोणाशी आहेत, याचीही चौकशी व्हावी. एका व्यक्तीला वाचवण्यासाठी कारवाई केली जात नसल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. एकीकडे हर्षवर्धन सपकाळ यांनी अर्थखात्यावरून राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे, तर दुसरीकडे उमेश पाटील यांनी राष्ट्रवादीच्या स्वाभिमानाचा मुद्दा पुढे करत काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे अर्थखात्याच्या प्रश्नावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. हेही वाचा…. अर्थखात्यासाठी CM फडणवीस राष्ट्रवादीला ब्लॅकमेल करतायत का?:हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप; अजितदादांच्या अपघातावरही व्यक्त केली शंका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवरून राज्य सरकार तसेच सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला राज्याच्या अर्थखात्याचा कारभार मिळवण्याची धमक नसल्याचा टोला लगावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही प्रकरणांचा आधार घेऊन राष्ट्रवादीला ब्लॅकमेल करत अर्थखाते स्वतःकडे ठेवत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमके कोणते प्रकरण आहे आणि त्यातून कोणावर दबाव टाकला जात आहे, याचा संबंधित पक्षाने खुलासा करावा, अशी मागणीही सपकाळ यांनी केली. सविस्तर वाचा….
Source link
अर्थखात्याचा निर्णय महायुतीचे नेतृत्व घेईल, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी हस्तक्षेप करू नये:सपकाळांच्या टीकेला उमेश पाटलांचे प्रत्युत्तर