![]()
संत परंपरेच्या माध्यमातून शेकडो वर्षांचे नाते असलेल्या श्रीक्षेत्र पैठण आणि पंढरपूर या दोन तीर्थक्षेत्रांना जोडणारा नवा दुवा निर्माण होत आहे. संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यासह वर्षभर श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या पैठण तालुक्यातील हजारो वारकरी व भाविकांसाठी पंढरपुरात हक्काचे भक्त निवास उभारले जात आहे. श्री संत एकनाथ महाराज संस्थानच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या या भक्त निवासाचे काम वेगाने सुरू असून, बुधवारी आमदार तथा संस्थानचे अध्यक्ष विलास भुमरे यांनी बांधकामस्थळी भेट देऊन कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याला शेकडो वर्षांची गौरवशाली परंपरा आहे. दरवर्षी पैठणहून निघणाऱ्या या सोहळ्यात हजारो वारकरी सहभागी होतात. याशिवाय वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम, यात्रा आणि विठ्ठल दर्शनासाठी पैठण परिसरातून मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरला जातात. मात्र, तेथे मुक्कामाच्या वेळी निवासाची योग्य सोय नसल्याने वारकऱ्यांची गैरसोय होते. ही अडचण दूर करून वारकऱ्यांना कायमस्वरूपी हक्काचे ठिकाण मिळावे, या मुख्य उद्देशाने संस्थानच्या माध्यमातून या भक्त निवासाची उभारणी करण्यात येत आहे. पाहणीदरम्यान आमदार विलास भुमरे यांनी बांधकामाची सद्यःस्थिती, सुरू असलेली कामे आणि भाविकांसाठी प्रस्तावित सुविधांची माहिती संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून घेतली. पैठणहून पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना याचा मोठा लाभ होईल, असा विश्वास आमदार भुमरे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी अप्पासाहेब निर्मळ, शहादेव लोहारे, शिवाजी तांबे उपस्थित होते. वेळेत काम पूर्ण करावे ः आमदार भुमरेंच्या सूचना आमदार विलास भुमरे यांनी बांधकामाची सद्य:स्थिती, सुरू असलेली कामे आणि भाविकांसाठी प्रस्तावित सुविधांची माहिती संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून घेतली. भक्त निवास महत्त्वाचे ठिकाण ठरणार असल्याने काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
Source link
पैठणच्या वारकऱ्यांसाठी पंढरपूरमध्ये भक्त निवास:आमदार विलास भुमरे यांच्याकडून कामाची पाहणी