Headlines

सामाजिक एकता:अखंड पाठ, नगरकीर्तन, प्रभातफेरीने मनमाड शहरात भक्तिमय वातावरण




मनमाड शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त मनमाड येथील गुरुद्वारामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अमृतसर आणि नांदेडनंतर भारतातील तिसरे महत्त्वाचे शीख धर्मीयांचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गुरुद्वारात अखंड धार्मिक पाठ, नगरकीर्तन, प्रदक्षिणा आणि लंगर असे कार्यक्रम सुरू आहेत. गुरु नानक देवजी यांच्या आगमन उत्सवानिमित्त गुरुद्वारा गुप्तसर येथून गुरु नानक दरबारपर्यंत नगरकीर्तन यात्रा काढण्यात आली. मंगळवारी (दि. २४) गुरुद्वारातून दुचाकी रॅली निघणार आहे. तसेच अखंड पाठाची समाप्ती आणि लंगर अर्थात महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात मनमाड परिसरातील सर्व भाविकांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन मनमाड गुरुद्वाराचे प्रबंधक बाबा रणजित सिंह यांनी केले आहे. दरम्यान, शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देवजी यांच्या जन्मोत्सवानिमित्त येथील शीख बांधव प्रभातफेरी काढून उत्सव साजरा करतात. जन्मोत्सवाच्या आठ दिवस आधीपासून प्रभातफेरी काढण्याची परंपरा आहे. मनमाड शहरातही ही परंपरा गेल्या ६० वर्षांपासून सुरू आहे. शहरातील छोट्या गुरुद्वारातून दररोज पहाटे प्रभातफेरी निघते. सूर्योदयापूर्वी मोठ्या संख्येने शीख धर्मीय स्त्री-पुरुष, तरुण-तरुणी आणि ज्येष्ठ नागरिक गुरुद्वारात एकत्र येतात. विधिवत पूजनानंतर पारंपरिक भजन-कीर्तन आणि वाद्यांच्या तालावर भजने म्हणत ही प्रभातफेरी शहरातून काढली जाते. या प्रभातफेरीत सहभागी होणाऱ्या शीख समाजातील महिला आणि बांधव फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करतात. विशेष म्हणजे, ही प्रभातफेरी आपल्या दुकान किंवा घरासमोरून जावी, यासाठी केवळ शीख बांधवच नव्हे, तर मनमाड शहरातील विविध धर्मीय नागरिकही आग्रह धरतात. या प्रभातफेरीच्या माध्यमातून शीख बांधव जनजागृती, सामाजिक एकता, बंधुभाव आणि प्रबोधनाचा संदेश देतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *