Headlines

दोन महिन्यांनंतरही सभेचे इतिवृत्त सादर नाही: नांदगाव खंडेश्वरच्या सत्ताधारी सदस्यांची सीओंकडे तक्रार; २४ तासांत इतिवृत्त देण्याची मागणी



अमरावती | नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीच्या २२ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त दोन महिन्यांनंतरही सादर झालेले नाही. यावरून सत्ताधारी सदस्यांनी मुख्याधिकारी निवृत्ती भालकर यांच्याकडे तक्रार केली आहे.

.

उपनगराध्यक्ष अब्दुल जमीर अब्दुल रहीम यांच्यासह सभापती आणि नगरसेवकांनी भालकर यांना पत्र पाठवले. २४ तासांत इतिवृत्त सादर करण्याची मागणी त्यांनी केली. तसे न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.

सदस्यांच्या म्हणण्यानुसार, २२ सप्टेंबरच्या सभेत शहराच्या विकासाशी संबंधित विषयांवर चर्चा झाली आणि अनेक ठराव बहुमताने मंजूर झाले. मात्र, इतिवृत्त तयार नसल्याने ठरावांवरील पुढील काम रखडल्याचा दावा त्यांनी केला आहे.

या पत्रावर उपनगराध्यक्ष अब्दुल जमीर अब्दुल रहीम, सार्वजनिक बांधकाम सभापती मोहम्मद रियाज मोहम्मद मुमताज, महिला व बालकल्याण उपसभापती शिला वाडेकर आणि स्वीकृत नगरसेवक मोहम्मद साजिद मोहम्मद शब्बीर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

नगरसेविका रजियाबी अब्दुल सलाम, आसिया शेख जमील शेख, अलमास बी. शेख हारून आणि प्रांजली गुल्हाने यांनीही पत्रावर स्वाक्षरी केली आहे.

मुख्याधिकारी निवृत्ती भालकर यांनी सांगितले की, मागणीनुसार इतिवृत्त तयार झाले आहे. नियमानुसार ते येत्या सर्वसाधारण सभेच्या वेळी संबंधितांना दिले जाईल.

याआधी मोर्शी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मांसाहारी पार्टीच्या आयोजनावरून चर्चेत आले होते. आता नांदगाव खंडेश्वरच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कारभारावर सत्ताधारी सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *