![]()
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 13 सेवाव्रतींना वाग्धारा राष्ट्रसेवा सन्मान समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.
.
अंधेरी, मुंबई येथील मुक्ति ऑडिटोरियम येथे आयोजित ‘वाग्धारा उत्सव व सन्मान समारोहात’ राज्यपालांच्या हस्ते ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक गौर हरिदास, मॅगसेसे पुरस्कार विजेते मानसोपचार तज्ज्ञ डॉ भरत वतवाणी, ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल नाडकर्णी यांसह 13 व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.
साहित्य, संस्कृती, कला, शिक्षण, वैद्यकीय सेवा आणि समाजसेवेच्या क्षेत्रात वाग्धारा संस्थेने गेल्या चार दशकांत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. समाज आणि राष्ट्रासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान करून ही संस्था समाजापुढे आदर्श निर्माण करीत आहे, असे प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केले.
समृद्ध सांस्कृतिक परंपरा, लोकशाही मूल्ये आणि सामाजिक समरसता ही भारताची सर्वात मोठी संपदा असल्याचे सांगून शांतता, सहअस्तित्व, सेवा आणि मानवकल्याण ही भारतीय मूल्ये आज अधिकच महत्त्वाची ठरली आहेत, असे राज्यपालांनी सांगितले.
साहित्य समाजाला विचार देते, कला भावनांना अभिव्यक्ती देते, संगीत आत्म्याला स्पर्श करते, पत्रकारिता समाजाला जागृत करते तर शिक्षण राष्ट्राची बौद्धिक शक्ती घडवते. या क्षेत्रांत योगदान देणारे लोक राष्ट्राची अमूल्य संपत्ती आहेत, असेही ते म्हणाले.
भारत हा जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक आहे. १५ ते ६५ वयोगटातील मोठी लोकसंख्या ही आपली खरी ताकद आहे. तरुणांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, संशोधन व नवोन्मेषाला प्रोत्साहन द्यावे आणि उद्योजकतेकडे वळावे. मात्र, आपली संस्कृती, संस्कार आणि राष्ट्राप्रती असलेली कर्तव्ये विसरू नये, असे आवाहन त्यांनी केले.
विद्यापीठांचा कुलपती या नात्याने राज्यपाल म्हणाले की, उच्च शिक्षणात विशेषतः ललित कला आणि प्रयोगात्मक कलांच्या अध्ययनाला अधिक महत्त्व दिले पाहिजे. कला इतर शैक्षणिक विषयांच्या अध्ययनाला पूरक ठरतात, सर्जनशीलता विकसित करतात आणि विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता, सहानुभूती व मानवी मूल्यांची जाणीव निर्माण करतात.
पुरस्कार सोहळ्याला माजी गृहराज्य मंत्री कृपाशंकर सिंह, शिक्षणतज्ज्ञ अजय कौल, ज्येष्ठ पत्रकार विमल मिश्र, निवड समितीचे अध्यक्ष जयंत देशमुख तसेच वाग्धारा संस्थेचे पदाधिकारी, सदस्य आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
राज्यपालांच्या हस्ते अजय कौल, डॉ. प्रशांत नाथू, डॉ. सोनू जेसवानी, डॉ. संकेत पुजारा, संदीप पाटिल, सूर्यदत्त शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. संजय चोरडिया, डॉ. सुप्रियो मुखर्जी, राजेश कुमार उपाध्याय, स्वाति मिश्रा (गायिका), डॉ. शैलेश श्रीवास्तव, आदींना सन्मानित करण्यात आले.