![]()
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतील आदिवासी, वंचित, बहुजन तसेच इतर समाजातील नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रकाश सुर्वे हे सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करीत आहेत.
.
याच अनुषंगाने तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता साहेबा यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक घेऊन नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली होती. या बैठकीमध्ये बाधित नागरिकांचे पुनर्वसन त्यांच्या सध्याच्या निवासस्थानाच्या जवळच व्हावे, अशी ठाम भूमिका आमदार प्रकाशदादा सुर्वे यांनी मांडली होती. त्यावर जवळपास 13 हजार नवीन घरांची उभारणी करण्याबाबत सकारात्मक आश्वासन देण्यात आले असून, त्यानुसार पुढील प्रशासकीय कार्यवाही सुरू झाली आहे.
तसेच कांदिवली येथील वनविभागाच्या हद्दीतील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी दामूनगर, कांदिवली येथील गोरखधाम पंचमंडळाच्या मालकीच्या उपलब्ध दहा एकर जागेवर पुनर्वसन करण्याचा पर्याय आमदार प्रकाशदादा सुर्वे यांनी सुचविला होता. या जागेचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा आणि त्यावर तातडीने सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी दिले होते.
याच विषयाला पुढे नेत आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार प्रकाश सुर्वे यांनी यापूर्वी मांडलेले पर्याय, जवळच 13 हजार घरांची उभारणी तसेच दामूनगर येथील गोरखधाम पंचमंडळाच्या दहा एकर जागेवरील पुनर्वसनाचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री महोदयांसमोर मांडला.
यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी नगरविकास विभागासोबत लवकरच बैठक घेऊन या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच नागरिकांच्या मागणीनुसार त्यांच्या पुनर्वसनासाठी योग्य निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील नागरिकांना विस्थापित न करता त्यांच्या हक्काच्या निवासाचा प्रश्न त्यांच्या अपेक्षेनुसार आणि शक्यतो मूळ परिसराच्या जवळच मार्गी लावण्यासाठी आमदार प्रकाश सुर्वे यांचा संघर्ष आणि पाठपुरावा अविरत सुरू आहे.
या बैठकीप्रसंगी विभागप्रमुख वैभव भराडकर, शाखाप्रमुख प्रकाश पुजारी, वैष्णवी प्रकाश पुजारी, सचिन केळकर, महादेव गालफाडे, दीपक सिंग, भगवान मोरे, शिवराम केंद्रे, खान, किशोर चांडे, बाबाजी चव्हाण तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. नागरिकांचे हक्काचे घर, सन्मानाचे जीवन आणि न्याय्य पुनर्वसन यासाठी प्रकाश सुर्वे यांचा पाठपुरावा कायम सुरूच राहणार.