Headlines

इंडुकेअर फार्मास्युटिकल कंपनीचा परवाना रद्द:पुण्यात FDA ची मोठी कारवाई, परवानगीशिवाय उत्पादन आणि विक्री केल्याचे उघड




तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून धडाकेबाज कारवायांचे सत्र सुरूच ठेवले आहे. सुरुवातीला हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई केल्यानंतर आता मुंढे यांनी आपला मोर्चा औषध उत्पादन कंपन्यांकडे वळवला आहे. पुण्यातील ‘इंडुकेअर फार्मास्युटिकल’ या कंपनीवर एफडीएने मोठी कारवाई करत तिचा औषध उत्पादन परवाना रद्द केला आहे. कंपनीची नऊ औषधे अप्रमाणित आणि बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. परवानगीशिवाय नऊ प्रकारच्या औषधांचे उत्पादन आणि विक्री केल्याप्रकरणी एफडीएने ‘इंडुकेअर फार्मास्युटिकल’वर ही कठोर कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान कंपनीची ही सर्व नऊ औषधे अप्रमाणित आणि बनावट असल्याचे उघड झाले. या कारवाईचा भाग म्हणून पिंपरी-चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातून कंपनीचा तब्बल 1 कोटी 72 लाख रुपयांचा औषध साठा जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या कंपनीवर परवाना रद्द होण्याची कारवाई होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी सप्टेंबर 2026 मध्येही 25 गंभीर त्रुटी आढळल्याने ‘इंडुकेअर फार्मास्युटिकल’चा परवाना रद्द करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही नियमबाह्य पद्धतीने उत्पादन सुरूच ठेवल्याने आता पुन्हा एकदा कंपनीचा औषध उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई प्रशासनाने केली आहे. तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीनंतर एफडीएच्या कारवायांना चांगलाच वेग आला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी बनावट प्रोटीन पावडर विक्री करणाऱ्यांना कडक इशारा दिला होता. आता थेट रुग्णालयांना पुरवल्या जाणाऱ्या बनावट औषधांचे रॅकेट उघडकीस आणून परवाना रद्द केल्याने सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *