Headlines

ST प्रवाशांना मोठा दिलासा!:आता 'NCMC' स्मार्ट कार्डचे रिचार्ज करता येणार केवळ 5 रुपयांच्या पटीत; 50 रुपयांच्या किमान रिचार्जची अट रद्द




महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह सवलतधारक प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड अनिवार्य केले आहे. मात्र, या कार्डच्या सक्तीची अंमलबजावणी 1 जानेवारी 2027 पर्यंत स्थगित करण्यात आली असून, या दरम्यान एसटी महामंडळाने प्रवाशांच्या हिताचा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता प्रवाशांना या कार्डचा रिचार्ज केवळ 5 रुपयांच्या पटीत करता येणार आहे. ग्रामीण भागातील प्रवासी वारंवार प्रवास करत नसल्याने त्यांचे पैसे कार्डमध्ये अडकून पडत असल्याच्या तक्रारी होत्या, त्या पार्श्वभूमीवर हा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी एनसीएमसी कार्डमध्ये किमान 50 रुपयांच्या पटीतच रिचार्ज करण्याची अट होती. आता प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने टॉप-अपच्या नियमात मोठा बदल केला आहे. नव्या नियमानुसार प्रवाशांना आपल्या प्रवासाच्या गरजेनुसार 5, 10, 15, 20 किंवा 25 रुपयांचा छोटा टॉप-अपही करता येणार आहे. यामुळे प्रवाशांना हव्या तेवढ्याच रकमेचा रिचार्ज करणे अधिक सोपे आणि सोयीस्कर झाले आहे. रिचार्जवरील 11.80 रुपयांचे कमिशनही होणार रद्द एनसीएमसी कार्डमध्ये रिचार्ज केल्यानंतर यापूर्वी प्रवाशांकडून 11 रुपये 80 पैसे कमिशन म्हणून वजा केले जात होते, ज्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण होते. प्रवाशांची ही गैरसोय लक्षात घेऊन आता रिचार्जवरील हे कमिशन आकारणे रद्द केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या व्यवहारावरील आवश्यक तो कर (टॅक्स) आकारला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 31 डिसेंबरपर्यंत विनाकार्ड प्रवास सवलतीचा लाभ एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला 1 जानेवारी 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या महिला व ज्येष्ठ नागरिक प्रवाशांनी अद्याप हे स्मार्ट कार्ड काढलेले नाही, त्यांना 31 डिसेंबरपर्यंत कार्ड काढून घेणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, 31 डिसेंबर 2026 पर्यंत एनसीएमसी स्मार्ट कार्ड नसतानाही महिला आणि ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांना नेहमीप्रमाणे प्रवास सवलतींचा लाभ घेता येणार आहे. 1 जानेवारीनंतर कार्ड नसल्यास पूर्ण तिकीट काढावे लागणार 1 ऑक्टोबर 2026 पासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी हे कार्ड अनिवार्य करण्यात आले होते आणि 6 नोव्हेंबरपर्यंत 1 कोटी 10 लाख कार्डांची नोंदणी व वितरण पूर्ण झाले आहे. आता 31 डिसेंबरपर्यंत 100 टक्के लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामंडळाने ठेवले आहे. सर्व प्रवाशांनी या मुदतवाढीच्या कालावधीत कार्ड काढून घ्यावे, अन्यथा 1 जानेवारी 2027 नंतर कार्ड नसणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी तिकिटाची पूर्ण रक्कम मोजावी लागू शकते, असे आवाहन महामंडळाने केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *