![]()
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सालाबादाप्रमाणे यंदाही त्रिपुरारी पौर्णिमा मोठया भक्तीभावात व उत्साहात साजरी करण्यात आले . दिवसभर सुमारे लाखभर भाविक स्वामिचारणी लीन झाले. परगांवहून आलेल्या पालखी, भाविक यांच्यामुळे मंदिर परिसरासह अक्कलकोट नगरी फुलून गेली. त्रिपुरारी पौर्णिमेस श्री वटवृक्ष मंदिरात महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. पौर्णिमेनिमित्त पहाटे ५ वाजता पुरोहित मोहनराव पुजारी यांच्या अधिपत्याखाली, पुरोहित मंदार महाराज, व्यंकटेश महाराज यांच्या मुखाने, चेअरमन महेश मालक इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वामींची काकड आरती व सकाळी ११:३० वाजता श्रींची महानैवेद्य आरती संपन्न झाली. स्वामी भक्तांच्या दर्शनाकरिता मंदिर खुले करण्यात आले. स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता नित्यनियमाने होणारे अभिषेक आज बंद ठेवण्यात आले होते. स्वामींच्या पालखीसह परगावाहून पायी चालत निघालेले स्वामीभक्त व अन्य स्वामीभक्त आज स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले. पुणे, दौंड, मालेगाव, मसले चौधरी, बार्शी, धाराशीव, जेजुरी, फलटण, सोलापूर, मुंबई इत्यादी ठिकाणांहून दिंडी व पालखी सोबत हजारो पदयात्री स्वामीभक्त श्रींच्या दर्शनाकरिता आले होते. सदर दिंडी व पालखी यांचे स्वागत व पूजन मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांचे हस्ते करण्यात आले. या दिंडीसोबत आलेल्या हजारो स्वामी भक्तांनी स्वामी दर्शन घेऊन देवस्थानच्या भक्त निवास येथे भोजन महाप्रसादाचा लाभ घेतला. या सर्व भाविकांची महाप्रसादाची सोय वटवृक्ष देवस्थानच्या वतीने केली होती. याप्रसंगी समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, उज्वला सरदेशमुख, गिरीश पवार, सागर गोंडाळ, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार, महेश मस्कले, श्रीकांत मलवे व देवस्थानचे कर्मचारी, सेवेकरी उपस्थित होते. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिर आणि परिसर रोषणाईने उजळून निघाला होता. दीपोत्सवाने उजळला मंदिर परिसर सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होऊन कोणतेही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताकरिता आलेले पोलिस कर्मचारी व समितीचे सर्व सेवेकरींनी परिश्रम घेतले. दिवसभरात अनेक स्वामी भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले. सायंकाळी हजारो दिव्यांच्या दीपप्रज्वलनाने दीपोत्सव साजरा करून त्रिपुरारी पौर्णिमेची सांगता झाली.
Source link
राज्यातील विविध भागातून दिंडी, पालखी सोहळे स्वामींच्या भेटीला:मंदिर समितीच्या वतीने पालख्यांचे केले स्वागत