![]()
विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात गुन्हेगारीने कळस गाठला असून, बुधवारी (25 नोव्हेंबर) भरदिवसा शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या गेट नंबर 4 बाहेर गोळीबार आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. न्यायालय परिसरात नेहमीप्रमाणे मोठी वर्दळ असताना, 6 ते 7 हल्लेखोरांच्या टोळीने एका तरुणावर आधी गोळीबार केला आणि तो जीव वाचवण्यासाठी पळत असताना त्याचा पाठलाग करून कोयत्याने सपासप वार करत त्याचे दोन्ही हात शरीरापासून वेगळे केले. या रक्तरंजित थरारानंतर आरोपींनी घटनास्थळी 2 पिस्तुले आणि काडतुसांनी भरलेली मॅगझिन टाकून तोफखाना चौकाच्या दिशेने पळ काढला. या भयानक घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात प्रचंड दहशत पसरली असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेत हल्ला झालेल्या युवकाचा मृत्यू झाला आहे. नेमका थरार कसा घडला? वकिलांनी सांगितला प्रत्यक्ष अनुभव न्यायालयाच्या दुसऱ्या मजल्यावर उपस्थित असलेल्या वकिलांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास हा हल्ला झाला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, एका दुचाकीवरून 3 आणि दुसऱ्या दुचाकीवरून 4 असे एकूण 6 ते 7 हल्लेखोर कोयते आणि बंदुका घेऊन शिवाजीनगर कोर्टाच्या गेट नंबर 4 बाहेर आले होते. तर काही प्रत्यक्षदर्शींनी हल्लेखोरांची संख्या 4 ते 5 असल्याचे सांगितले आहे. गोळीबार आणि पाठलाग करून कोयत्याने वार कोर्टात कामासाठी आलेल्या एका तरुणावर आरोपींपैकी एकाने अचानक बंदूक काढून गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज होताच संबंधित तरुण जीव वाचवण्यासाठी शिवाजीनगर कोर्टापासून फॅमिली कोर्टाच्या दिशेने पळू लागला. मात्र, इतर हल्लेखोरांनी हातात कोयते घेऊन त्याचा पाठलाग केला आणि त्याला गाठून त्याच्यावर सपासप वार केले. या अमानुष हल्ल्यात तरुणाचे दोन्ही हात छाटले गेले, तर या घटनेत एकूण 2 व्यक्ती जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दहशतीमुळे कोणीही मदतीला धावले नाही भरदिवसा कोर्टाबाहेर बंदुका आणि कोयते नाचवत हल्ला सुरू असल्याने परिसरात एकच पळापळ आणि भीतीचे वातावरण पसरले. हल्लेखोरांकडील शस्त्रे पाहून कोणीही मदतीसाठी पुढे जाण्याचे धाडस केले नाही. हल्ल्यानंतर आरोपी तोफखाना चौकाच्या दिशेने पसार झाले. घटनास्थळी 2 पिस्तुले आणि लोडेड मॅगझिन जप्त; गुन्हे शाखेकडून तपास सुरू घटनेची माहिती मिळताच कोर्ट बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी काही क्षणांतच घटनास्थळी दाखल झाले. हल्ल्यानंतर संबंधित तरुण रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला होता. पोलिसांनी तातडीने एका रिक्षातून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून, प्राथमिक माहितीनुसार त्याचा मृत्यू झाल्याचीही चर्चा आहे; मात्र अद्याप त्याची ओळख पटलेली नाही किंवा मृत्यूबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. परिसर सील आणि फॉरेन्सिक टीम दाखल पोलिसांनी कोर्टाच्या गेट नंबर 4 चा संपूर्ण परिसर सील केला आहे. घटनास्थळावरून 2 पिस्तुले आणि जिवंत काडतुसांनी भरलेली पूर्ण लोड मॅगझिन सापडली असून फॉरेन्सिक पथकाने नमुने गोळा केले आहेत. गुन्हे शाखेची (क्राइम ब्रांच) पथके आरोपींच्या मागावर रवाना झाली असून परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. 2 दिवसांपूर्वीच कोर्ट उडवून देण्याची धमकी; सकाळीच ‘कोयता गँग’चे फुटेज व्हायरल या घटनेमुळे पुणे पोलिसांच्या कारभारावर चौफेर टीका होत आहे. अवघ्या 2 दिवसांपूर्वीच पुणे न्यायालयाची इमारत बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतरही न्यायालय परिसरातील सुरक्षा व्यवस्था इतकी कमकुवत कशी राहिली, असा सवाल वकील वर्गातून विचारला जात आहे. विशेष म्हणजे, आज सकाळीच पुण्यातील ‘कोयता गँग’च्या दहशतीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. पुण्यात ‘कोयता गँग’ अस्तित्वात नसल्याचा दावा पोलिसांकडून वारंवार केला जात असला, तरी आता थेट न्यायालयाच्या दारातच गोळीबार आणि कोयत्याने हात छाटल्याची घटना घडल्याने पुण्यात गुंडांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा संतापजनक सवाल पुणेकर विचारत आहेत. ————————————— हेही वाचा… जळगावच्या 6 जणांना गुजरातच्या कालव्यात फेकले: आई-वडिलांसह 3 जणांचा मृत्यू, 13 वर्षीय मुलाने पाइप पकडून वाचवला जीव, दोन मुले बेपत्ता; चौघांविरोधात गुन्हा सूरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ मजुरीचे काम करणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना कालव्यात फेकून दिल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मूळचे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल परिसरातील हे कुटुंब मजुरीच्या कामासाठी सूरतला येत असताना अज्ञात कारमधून आलेल्या चार जणांनी त्यांची कार अडवली. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांना वेगवेगळ्या कारमध्ये बसवून कालव्यात फेकून दिल्याचा आरोप आहे. या घटनेत आई-वडिलांसह तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत, तर 13 वर्षीय मुलाने पाइपच्या साहाय्याने आपला जीव वाचवला. कुटुंबातील इतर दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत. या प्रकरणी महाराष्ट्रात राहणाऱ्या कुटुंबातील विवाहित मुलीच्या तक्रारीवरून बारडोली पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
पुण्यात शिवाजीनगर कोर्टाच्या गेटबाहेर गोळीबार, एकाचा मृत्यू:गोळीबारानंतर पाठलाग करत कोयत्यानेही हल्ला, घटनास्थळावरून 2 पिस्तूल आणि लोडेड मॅगझिन जप्त