![]()
पुण्यात वारजे परिसरात गांजा विक्री करणाऱ्या महिलेला गुन्हे शाखेने अटक केली. तिच्याकडून 592 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. त्याची किंमत 29 हजार 600 रुपये आहे. अटक केलेल्या महिलेचे नाव सुनीता सिकंदर भाट (वय 55, रा. अमर भारत सोसायटी, वारजे) आहे. गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पथक वारजे आणि नांदेड सिटी भागात गस्त घालत होते. अमर भारत सोसायटी परिसरात एक महिला गांजा विकत असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे आणि पोलिस कर्मचारी तुषार किंद्रे यांना मिळाली. त्यानंतर पथकाने सापळा लावून भाट यांना ताब्यात घेतले. भाट यांच्याविरुद्ध वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वीही त्यांच्याविरुद्ध अमली पदार्थ विक्रीचे दोन गुन्हे दाखल झाले होते. अतिरिक्त पोलिस आयुक्त तेजस्वी सातपुते, उपायुक्त गौहर हसन आणि सहायक आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. पथकात वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, अर्चना वाघमारे, किशोर शिंदे, कैलास लिमण, मनोज पवार, काटकर, अमित बोडरे, आशिष राठोड, योगेश झेंडे, तुषार किंद्रे आणि विपुल गायकवाड यांचा समावेश होता. कोयता बाळगल्याप्रकरणी आरोपी अटक धायरी परिसरात कोयता बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट तीनने हेमंत पुरुषोत्तम वाणी (वय 18, रा. शिवप्रस्थ हाईट्स, धायरी) याला अटक केली. त्याच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. दोघांकडून दोन कोयते जप्त करण्यात आले. पोलिस कर्मचारी मनोज पवार आणि अमित बोडरे धायरी परिसरात गस्त घालत असताना वाणी याच्याकडे कोयता असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी वाणी आणि अल्पवयीनाला ताब्यात घेतले.
Source link
वारजेत गांजा विकणाऱ्या महिलेला अटक:महिलेकडून 592 ग्रॅम गांजा जप्त; किंमत 29 हजार 600 रुपये